

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर येथे मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून, या भागातील वाहतूक व्यवस्थेत गुरुवारपासून (दि. 29) 27 डिसेंबरपर्यंत बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर न्यायालय ते नगर रोडवरील रामवाडीदरम्यान मार्गिकेचे काम सुरू आहे. कल्याणीनगर येथील मेट्रो स्थानकाचे काम सुरू करण्यात येणार असून, गुरुवारपासून ( दि. 29) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
कल्याणीनगर परिसरातील एन. एम. चव्हाण चौकाकडून गोल्ड लॅब मल्टिप्लेक्सकडे जाणारी वाहतूक, तसेच गोल्ड लॅबपासून एन. एम. चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.
पर्यायी मार्ग असे – बिशप स्कूलकडून एन. एम. चव्हाण चौकाकडे जाणारी वाहतूक गोल्ड लॅब चौकातून उजवीकडे वळविण्यात येणार आहे. कल्याणीनगर गल्ली क्रमांक सात येथून डावीकडे वळून वाहनचालकांनी एन. एम. चव्हाण चौकाकडे जावे. कोरेगाव पार्क परिसरातील एबीसी फार्म चौकातून येणार्या वाहनचालकांनी एन. एम. चव्हाण चौकातून डावीकडे वळावे. त्यानंतर कल्याणीनगर गल्ली क्रमांक तीन येथून उजवीकडे वळून गोल्ड लॅब चौकाकडे वळावे.