...अन् ‘त्यांनी’ अनुभवल्या दिव्यांगांच्या वेदना! सहाशेहून अधिक जणांच्या सहभागाने खराडीत पार पडली ‘ब्लाइंड फोल्डेड मॅरेथॉन’ | पुढारी

...अन् ‘त्यांनी’ अनुभवल्या दिव्यांगांच्या वेदना! सहाशेहून अधिक जणांच्या सहभागाने खराडीत पार पडली ‘ब्लाइंड फोल्डेड मॅरेथॉन’

येरवडा, पुढारी वृत्तसेवा: प्रत्येकाला दिव्यांग व्यक्तीप्रती कणव वाटत असते; मात्र त्यांच्या वेदना काय असतात, हे अनुभवणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. त्यामुळे अंध बांधवांच्या समस्या आणि अंधत्व याबाबतीत जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने रविवारी ‘ब्लाइंड फोल्डेड मॅरेथॉन’ हा अनोखा उपक्रम खराडी येथे पार पडला. या मॅरेथॉनमध्ये सुमारे 600 खेळाडूंनी सहभागी होत आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

या मॅरेथॉनमध्ये दोन धावपटूंचा एक संघ असतो. यात एका धावपटूच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि संघातील दुसर्‍या धावपटूने डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या धावपटूला मार्गदर्शन करत या मॅरेथॉनचे अंतर पूर्ण करायचे असते. अशा अनोख्या मॅरथॉनमध्ये सहभागी होणं हा खूप वेगळा अनुभव होता. या मॅरेथॉनमुळे अंध बांधवांना दैनंदिन जीवनात कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते याची जाणीव झाली, अशी भावना या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्यांकडून व्यक्त करण्यात आली. सुरेंद्र पठारे फाउंडेशन आणि अग्रदूत बांगो समाज यांच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. मिस इंडिया 2023, कशीश मेथवाणी आणि सुरेंद्र पठारे फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते मॅरेथॉनला सुरुवात झाली.

Back to top button