पिंपरी : जलशुद्धीकरणाची क्षमता वाढीसाठी 2 कोटींचा खर्च | पुढारी

पिंपरी : जलशुद्धीकरणाची क्षमता वाढीसाठी 2 कोटींचा खर्च

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निगडीतील सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिनेटर्सची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी 37 लाख खर्च करण्यात येणार आहे. यासह विविध कामांसाठी एकूण 17 कोटी खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि.27) मंजुरी दिली. आयुक्त सिंह यांनी घेतलेल्या स्थायी समितीच्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यात येत आहे. त्यातील क्लोरिनेटर्सची क्षमता वाढविण्याच्या येणार्‍या खर्चास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.

पुणे पालिकेच्या निविदा समितीवर आयुक्त उपाध्यक्ष

पुणे महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मुळा नदी पुनरुज्जीवन योजनेच्या संयुक्त निविदा समितीमध्ये पिंपरी-चिंचवड पालिकेच्या आयुक्तांना उपाध्यक्ष, शहर अभियंता, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड हद्दीतील मुळा नदीचा खर्च पालिका पुणे पालिकेस अदा करणार आहे. या प्रस्तावांना आयुक्तांनी मंजुरी दिली.

कासारवाडीतील व्हॉल्व्ह ऑपरेशनसाठी 80 लाख खर्च

तसेच, क क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांवर पाणीपुरवठा संबंधित व्हॉल्व्ह ऑपरेशन करण्यासाठी 12 महिने मजूर पुरविण्याचा खर्च 2 कोटी 93 लाख आहे. ह क्षेत्रीय कार्यालयातील संत तुकारामनगर व कासारवाडी टाकी परिसरातील व्हॉल्व्ह ऑपरेशनसाठी मजूर पुरविण्याचा खर्च 80 लाख आहे. पीएमपीएलला सन 2021- 22 या वर्षातील ऑक्टोबर 2022 या महिन्याच्या संचलन तूट 10 कोटी आहे. ती देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. बेशिस्त नागरिकांना पालिकेच्या वतीने ऑनलाइन दंड आकारला जातो. त्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचा तीन महिने कामासाठी 7 लाख 95 हजार खर्च आहे.

Back to top button