चांदणी चौकातील वाहतूक राहणार नऊ तास बंद; मुंबई- साताऱ्याला जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी तीन मार्ग

चांदणी चौकातील वाहतूक राहणार नऊ तास बंद; मुंबई- साताऱ्याला जाणाऱ्या हलक्या वाहनांसाठी तीन मार्ग
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल रविवारी 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन वाजता हा पूल जमीनदोस्त केला जाणार आहे. त्यामुळे शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री 11 वाजल्यापासून रविवारी (2 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ तास चांदणी चौकातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत मुंबईकडून सातार्‍याकडे आणि सातार्‍याकडून मुंबईकडे जाणार्‍या हलक्या वाहनांसाठी प्रशासनाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती वाहतूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

चांदणी चौकातील जुना उड्डाणपूल पाडण्याबाबत संबंधित यंत्रणांची मंगळवारी बैठक झाली. वाहतूक पोलीस उपआयुक्त राहुल श्रीरामे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, '1 ऑक्टोबर रोजी रात्री 11 ते 2 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ या कालावधीत चांदणी चौकातील वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबईकडून येणारी जड वाहतूक तळेगाव दाभाडे पथकर नाक्याच्या (टोल नाका) पलीकडे, तर सातार्‍याकडून येणारी जड वाहतूक खेड-शिवापूर परिसरात थांबविण्यात येणार आहे. पूल पाडण्याच्या कामासाठी वाहतूक बंद कालावधीत केवळ हलक्या वाहनांसाठी मुंबईकडून सातार्‍याकडे आणि सातार्‍याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत, अशी माहिती श्रीरामे यांनी दिली.

मुंबईकडून सातार्‍याकडे जाणारी हलकी वाहने जुन्या पुणे-मुंबई पथकर नाक्यावरून (टोल नाका) सोमाटणे फाटा, देहू रोड, भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, खडकी, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक (म़ॉडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजी बाबा चौक, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्ता, कात्रज चौकातून सातार्‍याकडे जाऊ शकणार आहेत. तसेच मुंबईवरून वाकड येथे आल्यानंतर राजीव गांधी पुलावरून औंध, आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले विद्यापीठासमोरील चौक), संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक, स्वारगेट, सातारा रस्त्यावरून सातार्‍याकडे मार्गस्थ होतील. याशिवाय मुंबईवरून बाणेर येथे आल्यानंतर विद्यापीठ चौक, संचेती रुग्णालय, स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक चौक आणि स्वारगेटवरून सातारा रस्त्यावरून सातार्‍याकडे जाता येणार आहे.

दरम्यान, हलक्या वाहनांसाठी सातार्‍याकडून मुंबईकडे जाताना जुना बोगदामार्गे कात्रज-स्वारगेट-टिळक चौक-शिवाजीनगर-विद्यापीठ चौकातून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून थेट महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाऊ शकतील. सातार्‍याकडून मुंबईकडे जाताना दुसरा पर्यायी रस्ता नवले पूल, वडगाव पूल, सिंहगड रस्ता, राजाराम पूल, स्वर्गीय राजा मंत्री पथावरून (डीपी रस्ता), नळस्टॉप, पौड फाटा, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल किंवा सातार्‍याकडून मुंबईकडे जाताना तिसरा पर्यायी रस्ता वारजे पूल, कर्वे रस्त्याने आंबेडकर चौक, वनदेवी, कर्वे पुतळा चौक, पौड फाटा, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट मार्ग, विद्यापीठ चौक आणि तेथून बाणेर किंवा पाषाण किंवा औंध रस्त्यावरून महामार्गावरून मुंबईकडे जाता येईल, असे श्रीरामे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news