वाल्हे परिसरात झेंडू लागवडीवर भर, सणांचा हंगाम साधण्यासाठी शेतकर्‍यांकडून लागवडीचे नियोजन | पुढारी

वाल्हे परिसरात झेंडू लागवडीवर भर, सणांचा हंगाम साधण्यासाठी शेतकर्‍यांकडून लागवडीचे नियोजन

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  कमी कालावधीत चांगले पैसे मिळतील, या इराद्याने अनेक शेतकरी झेंडू फूलशेतीकडे वळाले आहेत. त्यासाठी सणांचा हंगाम साधण्यासाठी शेतकरी नियोजन करतात.  गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंतच्या सणासुदीत झेंडू फुलांना चांगला दर मिळून चार पैसे मिळतील, अशी शेतकर्‍यांना आशा वाटत आहे. मागील काही दिवसांत सलग मुसळधार पावसाने अनेकांचे झेंडू जमीनदोस्त झाले आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दौंडज खिंड, तरसदरा, वाल्हे (ता. पुरंदर) या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, मागील दोन वर्षात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकर्‍यांनी झेंडू पिकांचे उत्पादन घेतले नव्हते. मात्र यंदा कोरोना संकट नसल्याने नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहता पुन्हा मोठ्या प्रमाणात झेंडू लागवड झाली आहे.

पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरच अनेक शेतकरी झेंडू विकण्यासाठी दौंडज खिंड ते वाल्हे परिसरात बसतात. जेजुरीला येणारे भाविक आवर्जून थांबून फुलांची खरेदी करतात. दरवर्षी जेजुरीमधून मोठ्या शहरामध्ये झेंडूची फुले विक्रीसाठी अनेक मोठे व्यापारी घेऊन जात असतात. जेजुरीची बाजारपेठ झेंडूच्या विक्रीसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. तसेच जेजुरी औद्योगिक वसाहतीमध्येही खंडेनवमीसाठी झेंडूला मागणी असते. मात्र, यंदा पावसामुळे उत्पादनात घटीने फुलांना चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा येथील शेतकरीवर्गाला आहे.

यंदा चांगल्या भावाची अपेक्षा
मागील दोन वर्षांत कोरोनामुळे झेंडूच्या फुलांचे पैसे झाले नाहीत. यंदा कोरोनाचे सावट दूर झाले असून, सर्वत्र उत्सव निर्बंधमुक्त होत आहेत. मात्र, या वर्षी जादा पाऊस फुलांसाठी घातक ठरला आहे. त्यामुळे दसर्‍याला झेंडूला चांगला बाजारभाव मिळेल, असे विजय जगताप, विलास कदम, योगेश कदम, संतोष शेटे, रवींद्र शेटे, बाळकृष्ण कदम, बाबासो कदम आदींनी सांगितले.

Back to top button