पुणे : मामाच्या मुलाने काढला लाँड्रीचालकाचा काटा, पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला गुन्ह्याचा छडा | पुढारी

पुणे : मामाच्या मुलाने काढला लाँड्रीचालकाचा काटा, पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला गुन्ह्याचा छडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शनिवार पेठेतील लाँड्रीचालकाचा मृतदेह नदीपात्रात मिळाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला. त्याला त्याच्या मामाच्या मुलाने नदीपात्रात बोलावून घेऊन त्याला दारू पाजून त्याचा धारदार हत्यारांनी निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेक्कन पोलिसांनी खून करणार्‍या तिघांना उर्से येथून अटक केली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेश सुरेश कदम (वय 35, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  नरेश गणेश दळवी (वय 30), अजय शंकर ठाकर (वय 25), समीर वैैलास कारके (वय 26, सर्व रा. उर्से, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे. संयशित आरोपी नरेश हा गणेश कदम यांच्या मामाचा मुलगा आहे.

कदम यांचा लाँड्री व्यवसाय होता. सोमवारी (दि. 26) दुपारी डेक्कन नदीपात्रात पोलिसांना कदम यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या चेहर्‍यावर असलेल्या जखमा आणि इतर माहितीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेनंतर डेक्कन पोलिसांनी तत्काळ आरोपींचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक पद्धतीने तपास केला असता आरोपी हे उर्से परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पोलिसांच्या पथकाने तिघांना उर्से येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. आरोपी नरेश आणि कदम यांच्यात पूर्वीचे वाद होते.

यातूनच नरेशने कदम यांना डेक्कन नदीपात्रात बोलावून घेतले. त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्यांना दारू पाजली. यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचा खून केला. नरेश हा कदम यांच्या मामाचा मुलगा असून, त्याच्या या कटात आणखी कोण सहभागी आहे, याचा तपास डेक्कन पोलिसांकडून सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे, पोलिस उपनिरीक्षक गणेश मोरे, दत्तात्रय सावंत, सहायक फौजदार नीलेश पाटील, हवालदार धनश्री सुपेकर, शेखर कौटकर, राम गरुड, रोहित मिरजे, गणेश तरंगे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

गणेश कदमचा मामाचा मुलगा नरेशने त्याला नदीपात्रात बोलावून घेतले. तेथे तो आधीपासूनच दारू पित बसला होता. नरेश आणि त्याच्या साथीदारांनी आणखी दारू आणून त्याला पाजली. त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. तांत्रिक विश्लेषणावरून आमच्या पथकाने तिघांना तत्काळ अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
                            – मुरलीधर करपे, वरिष्ठ निरीक्षक, डेक्कन पोलिस ठाणे

Back to top button