

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दहशत पसरविण्यासाठी दहीहंडी उत्सवांमध्ये गोळीबार करणार्या गुंडासह 17 जणांविरुद्ध पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी (मोक्का) कायद्यानुसार कारवाई केली आहे. गुप्ता यांनी केलेली ही 96 वी मोक्का कारवाई आहे. या वर्षातील मोक्कानुसार केलेली ही 33 वी कारवाई आहे. टोळीप्रमुख चेतन पांडुरंग ढेबे (वय 25), बाळू धोडींबा ढेबे (वय 24), अनुराग राजू चांदणे (वय 20), रमेश धाकलू कचरे (वय 19), वैभव शिवाजी साबळे (वय 20), रोहन दत्ता जाधव (वय 20), अक्षय तायाजी आखाडे (वय 21), सुनील धारासिंग पवार (वय 19), साहिल बबन उघडे यांच्यासह आठ अल्पवयीनांचा समावेश आहे.
चेतन ढेबे हा सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
ढेबे टोळीने दहशतीसाठी मारामारी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, कोयत्यासह घातक शस्त्रे जवळ बाळगून दंगा करणे, असे गंभीर गुन्हे केले आहेत. दहीहंडी उत्सवामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी चेतन ढेबे याने गोळीबार केला होता. त्याच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सिंहगड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांच्या वतीने अपर आयुक्त राजेंद्र डहाळे यांना पाठविला होता. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे, पोलिस निरीक्षक जयंत राजूरकर, सहायक निरीक्षक सचिन निकम, मीनाक्षी महाडीक, स्मित चव्हाण, गुरव यांनी केली. सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार तपास करीत आहेत.