पुणे : नामफलकांवर संकल्पना नकोच, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांचे मत | पुढारी

पुणे : नामफलकांवर संकल्पना नकोच, सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संकल्पनेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्यासाठी नगरसेवक गरज नसेल तेथे नवीन नामफलक उभे करतात. त्यामुळे नागरिकांच्या कररुपी पैशांतून उभारण्यात येणार्‍या नामफलकांवर संकल्पनेला जागाच असू नये, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केले आहे. महापालिकेकडून केल्या जाणार्‍या विकासकामांना आणि वास्तूंना प्रशासनाकडून निळ्या किंवा हिरव्या रंगाचे नामफलक लावले जातात. त्यानंतरही नगरसेवकांकडून विकास निधी खर्च करण्यासाठी पुन्हा नामफलक लावले जातात. या नामफलकांवर वास्तूच्या नावापेक्षा मोठे नाव संकल्पना म्हणून नगरसेवक स्वतःचे टाकतात. एका प्रभागात एकापेक्षा जास्त नगरसेवक असल्याने एकाच ठिकाणी चार-पाच नामफलक उभे केले आहेत. त्यातच नामफलकांवर राजकीय पक्षांचे रंग आणि चिन्ह छापून नगरसेवक स्वतःसह पक्षाचीही फुकटची प्रसिद्धी करून घेत आहेत.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने नामफलकांसंदर्भात नवीन धोरण तयार केले आहे. त्याला अद्याप महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाली नाही. हे धोरण चर्चेतच अडकले आहे.  नवीन धोरणामध्येही संकल्पनेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे धोरण अमलात आल्यानंतर नामफलकांच्या संख्येला लगाम लागणे शक्य नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी नामफलकावर संकल्पनेला स्थान नसावे, अशी भूमिका घेतली आहे.

 

नगरसेवकांकडून केवळ नावासाठी मूलभूत कामे सोडून दिखावू कामे करून संकल्पनेचे फलक लावले जातात. त्यामुळे सेवक म्हणून निवडून गेलेल्यांची चमकोगिरी फलकांवर नको. कोणाला प्रसिद्धी करायचीच असेल, तर जेवढ्या फलकांवर नगरसेवकांची नावे असतील, तेवढे पैसे त्यांनी मोजावेत. प्रशासनाने पैसे भरून घेऊनच संकल्पना म्हणून नगरसेवकांचे नाव टाकावे.

                                                 – लक्ष्मण जाधव, सामान्य नागरिक

नामफलकांवर नगरसेवकांची नावे टाकण्यासाठी खर्च, निवडणूक आल्यावर ती झाकण्याचा खर्च आणि नंतर ती काढण्याचा खर्च करणे म्हणजे नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी आहे. त्यामुळे नामफलकांवर संकल्पना व नगरसेवकांची नावे नसावीत. प्रशासनाने धोरणात बदल करावा, आणि संकल्पनेला स्थान
देऊ नये.

                                              – विवेक वेलणकर, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button