बेट भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट | पुढारी

बेट भागातील अंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट

पिंपरखेड; पुढारी वृत्तसेवा: जुलै, ऑगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने बेट भागातील गावांतील अनेक रस्त्यांची वाट लागली आहे. पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुरूम उपलब्ध नसल्याने गावातील अंतर्गत कच्च्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे मोठे आव्हान ग्रामपंचायतीसमोर आहे. बेट भागातील पिंपरखेड, काठापूर खु.,जांबुत, चांडोह, फाकटे, वडनेर, कवठे येमाई या बेट भागातील गावांतील कच्च्या रस्त्यांना अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.

पिंपरखेड व परिसरात दोन वेळा ढगफुटीसदृश पावसाने चांगलेच झोडपून काढले. ओढ्यांना आलेल्या पुराचे पाणी स्स्त्यावर आल्याने डांबरी रस्त्याला धोका पोहचून नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे व त्यामध्ये पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः पाहणी केली होती.

गावांमधील अनेक कच्चे रस्ते आहेत, या रस्त्याचे झालेले नुकसान, पडलेले खड्डे भरून काढण्यासाठी लागणारा मुरूम उपलब्ध नसल्याने खड्डे बुजवायचे कसे, असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांनी वळसे पाटील यांच्यासमोर मांडला होता. त्या वेळी यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून मुरूम उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु आजही पिंपरखेड परिसरातील रस्त्यावर मुरूम पडलेला नाही.

यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने बेट भागातील गावातील अंतर्गत अनेक रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती व खड्डे बुजवण्यासाठी मुरमाची गरज असून, जिल्हाधिकारी यांनी हे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी विशेष अधिकारातून ग्रामपंचायतींना गायरान जागेतील मुरूम काढण्यासाठी परवानगी द्यावी.

                                               डॉ. सुभाष पोकळे, सदस्य, पंचायत समिती शिरूर

Back to top button