बेल्हे : नळावणे खिंड परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी | पुढारी

बेल्हे : नळावणे खिंड परिसरात मोठ्या प्रमाणात मुरूम चोरी

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा: नळावणे खिंड परिसरात डोंगरातून बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन करणार्‍यांकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत आहे. परिणामी शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलावर पाणी फिरले आहे. नळावणे खिंड शिवारात असलेला डोंगरावरील नैसर्गिक मुरूम मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याचे दिसून येत आहे. उत्खननात हजारो ब्रास मुरूम चोरट्या पद्धतीने काढल्यामुळे परिसरातील नैसर्गिक पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. दुसर्‍या बाजूने या उत्खननामुळे सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला गेला आहे.

परिसरात महसूल, वनविभागाच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन केले जात आहे. त्यामध्ये महसूल विभागाच्या अधिकार्‍यांचाही हात असल्यामुळे हे गौण खनिजाचे उत्खनन दिवसेंदिवस वाढत आहे. जेसीबीच्या साहाय्याने खणल्यामुळे त्यालगतच्या 40 ते 50 वर्षे जुन्या झाडांच्या मुळांची माती ढासळून पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

नळावणे खिंड परिसरात राजरोसपणे जेसीबीद्वारे सुरू असलेल्या मुरूम उत्खननाला महसूल विभागाच्या कोणत्या अधिकार्‍यांचा छुपा आशीर्वाद आहे, याविषयी प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत आणे गावकामगार तलाठी स्वाती जाधव यांच्याशी कार्यालयात संपर्क साधला असता त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत. जुन्नर तहसीलदार कार्यालयात संपर्क साधला असता तहसीलदार कार्यालयाकडून या परिसरात मुरूम उत्खननाबाबतची कोणतीही परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.

Back to top button