बारामतीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर संततधार पाऊस | पुढारी

बारामतीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर संततधार पाऊस

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरासह तालुक्यात सोमवारी (दि. 26) सकाळपासूनच संततधार पावसाने हजेरी लावली. घटस्थापनेसाठी विविध साहित्य खरेदी करणार्‍या नागरिकांची यामुळे तारांबळ झाली. येथील देवीचा माळ मंदिरापासून अनेक नवरात्र मंडळे ज्योत नेतात, त्यांनाही पावसाने मोठी अडचण आणली.

दुपारी तीन वाजेपर्यंत संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. जवळपास आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या ग्रामीण भागात मात्र पावसाने हुलकावणी दिली. सलग आलेल्या सुट्यांमुळे तसेच सोमवारी झालेली घटस्थापना यामुळे शहरात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी फारशी गर्दी नव्हती.

शहरात झालेल्या पावसामुळे अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. संततधार पावसामुळे सखल भागात पाणी साठले होते. सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावण्याने सलग पाऊस होण्याची शक्यता आहे. शहराप्रमाणे तालुक्यातही सोमवारी पावसाचा जोर होता. तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात असून सोयाबीन काढण्यास पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे.

पाऊस काही दिवस पडल्यास शेतीकामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. बारामती शहर, फलटण रस्ता, औद्योगिक परिसर, जळोची, तांदूळवाडी, शारदानगर, उपनगर आदी भागात सोमवारी पावसाने हजेरी लावली. पाऊस उघडल्यामुळे शेतातील कामांना वेग आला असतानाच अचानक ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुसळधार पावसाची शक्यता असल्याने शेतकर्‍यांचा जीव टांगणीला लागला आहे. जूनपासून कमी- अधिक प्रमाणात सुरू झालेला पाऊस सप्टेंबरअखेरपर्यंत सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 

Back to top button