कार्ला : आई एकवीरादेवी मंदिरात घटस्थापना | पुढारी

कार्ला : आई एकवीरादेवी मंदिरात घटस्थापना

कार्ला : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला, वेहरगाव येथील कुलस्वामिनी आई एकवीरा देवी मंदिरात सोमवारी (दि.26) सकाळी घटस्थापनेने शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. या वेळी वेहेरगाव दहिवलीचे सरपंच अर्चना देवकर, पोलिस निरीक्षक नीलेश माने यांंच्या परिवाराच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. या वेळी उपसरपंच काजल पडवळ, पोलिस पाटील अनिल पडवळ, मुख्य पुजारी संजय गोविलकर, तेजस खिरे, गुरव प्रतिनिधी नवनाथ देशमुख, विजय देशमुख व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत सकाळची आरती करण्यात आली.

पोलिस बंदोबस्त तैनात
महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी, ठाकरे घराण्याची कुलदैवत असलेल्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या होत्या. तसेच, या नवरात्रोत्सव काळात एकवीरा देवी दर्शनासाठी गर्दी होणार असल्याने कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी लोणावळा उपविभागीय पोलिस आधिकारी भाऊसाहेब ढोले, सहायक निरीक्षक नीलेश माने, सचिन रावळ यांंच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्रीपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 16 पोलिस अधिकारी, 100 पोलिस कर्मचारी, एक कमांडो पथक, एक आरपीएफ पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे.

वेहरगाव येथील पायथा मंदिरात घटस्थापना
एकवीरा देवी मुख्य मंदिरानंतर वेहरगाव येथील पायथा मंदिरातदेखील मोठ्या उत्साहात सोमवारी घटस्थापना करण्यात आली.
या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद बोत्रे, मावळ संघटक सुरेश गायकवाड, माजी सरपंच गणपत पडवळ, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर पडवळ, सरपंच अर्चना देवकर आदी उपस्थित होते. नवरात्रोत्सवात दररोज अभिषेक, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

मंदिर परिसरात साफसफाई
एकवीरा देवी मंदिरातील एकवीरा देवस्थानचे प्रशासकीय व्यवस्थापक मंगेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बाळू गायकवाड, अरुण देवकर, राजू देवकर, तानाजी ढमाले, मीना गायकवाड यांंच्यासह एकवीरा देवस्थानचे कर्मचारी मंदिर परिसरात स्वच्छता ठेवत आहेत.

Back to top button