पुणे : सावंतांच्या वक्तव्याने समाजाचा अपमान: माजी मंत्री थोरात यांची टीका | पुढारी

पुणे : सावंतांच्या वक्तव्याने समाजाचा अपमान: माजी मंत्री थोरात यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेले वक्तव्य आंदोलनामध्ये भाग घेणार्‍या सर्वांसह संपूर्ण मराठा समाजाचा अपमान करणारे आहे. मंत्रिपदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीने तेवढ्याच जबाबदारीने बोलणे गरजेचे आहे, अशी टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. थोरात एका कार्यक्रमासाठी सोमवारी पुण्यात आले होते, त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. थोरात म्हणाले, देशविरोधी आणि संविधानविरोधी घोषणा देणार्‍यांवर जात- धर्म न पाहता कारवाई होणे गरजेचे आहे.

मात्र, भाजपला याच गोष्टी हव्या आहेत, त्यामुळे सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालत नाही. सरकार ज्या पद्धतीने आले, शिवसेनेत ज्या पद्धतीने फाटाफूट झाली. त्याच्याविरोधात न्यायालयाने निकाल दिला तर राज्यात निश्चित राष्ट्रपती राजवट लागेल, असे भाकीतही थोरात यांनी केले. नाना पटोले यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले, सत्ताधारी चुकीचे वागत असतील तर त्याच्यावर टीका करणे, विरोधक म्हणून आमचे कर्तव्य आहे, ते आमचे प्रदेशाध्यक्ष करत आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे जे करावे लागेल ते करण्याची काँग्रेसची भूमिका असेल. स्वतंत्र लढायचे की आघाडी करायची, याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button