राज्यातील सत्ताधाऱ्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका | पुढारी

राज्यातील सत्ताधाऱ्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची टीका

बारामती : पुढारी वृत्तसेवा : राज्यात मेरिटवर आलेले मोठे प्रकल्प इतरत्र जात आहेत. परराज्यात जाणाऱ्या या प्रकल्पांना काही मंत्रीच भेट देणार असल्याचे कळते आहे. मेरिटवर आलेले प्रकल्प बाहेर जात असल्याचे मोठे दुःख आहे. सत्ताधारी दिल्लीसमोर झुकण्यात धन्यता मानत आहेत. ते आज ज्या कृती करत आहेत, त्यामुळे त्यांना छत्रपतींचे नाव घेण्याचा अधिकार उरलेला नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या तीन दिवसीय दौऱ्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी हा दौरा केला जात असल्याची टीका होत असल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, राजकारणात आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मी १३ वर्षे खासदार आहे. किती दौरे केले याची माहिती सगळ्यांना आहे. विरोधकांना किमान माझ्यावर टिका करण्यासाठी काही मिळतेय ते त्यांना करू द्या. बारामतीत, राज्यात येणाऱ्या प्रत्येकाचे अतिथी देवो भवः या उक्तीप्रमाणे स्वागत आहे.

पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांना मिळाली आहे. त्यांनी अजित पवार यांच्यासारखा कामाचा वेग कायम ठेवावा. हा वेग कायम ठेवला नाही तर जिल्ह्याचे भले होणार नाही. नवीन सरकारने अनेक कामांना स्थगिती दिली आहे. ती काढून कामांना वेग द्यावा, अशी माझी पालकमंत्र्यांकडून अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या. तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त वक्तव्यासंबंधी विचारले असता, ज्यांचा स्वतःच्या खात्याबद्दल अभ्यास नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार.

वेदांतानंतर मेडीसन डिव्हाईन पार्क बाहेर जात असल्याचे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. याबद्दल त्या म्हणाल्या, राज्याचे हे मोठे दुदैव आहे. बेरोजगारी हे मोठे आव्हान आहे. दुसऱ्या राज्यात प्रकल्प जातो याचे दुःख नाही. पण आपला रोजगार हिरावला जात आहे. यासंबंधी आता राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक घ्यावी. नेतेमंडळींना सोबत घेत पंतप्रधानांची भेट घेत महाराष्ट्रावर होणारा अन्याय सांगावा. राज्यासाठी एकत्रित लढा देण्याची ही वेळ आहे.

 शिवभोजन थाळी बंद नको
महाविकास आघाडी सरकारने गरीबांसाठी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद करण्यात येणार असल्याच्या चर्चेवर त्या म्हणाल्या, सरकार प्रत्येक गोष्टीत राजकारण करते आहे. गरीब, कष्टकऱ्यांसाठी मागील सरकारने ही सोय केली होती. गरिबांच्या अन्नात त्यांनी राजकारण आणू नये.

फडणवीसांनी उत्तर द्यावे
राज्यातील मंत्री धमक्या देवू लागले आहेत. राज्यातील नागरिक व महिला म्हणून मी गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करते. तुमचे मंत्री सर्वसामान्यांना धमक्या देत आहेत. त्यांना तुम्ही आवरणार की नाही, याचे उत्तर त्यांनी द्यावे असे खा. सुळे म्हणाल्या.

Back to top button