पुणे: एटीएम फोडणारी परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश | पुढारी

पुणे: एटीएम फोडणारी परप्रांतीय टोळीचा पर्दाफाश

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोंढवा, हांडेवाडी, मोहम्मदवाडी भागात मध्यरात्री एटीएम बुथ फोडून चोरीचा प्रयत्न करणार्‍या परप्रांतीय टोळीतील दोघांना कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेले पाच गुन्हे यावेळी उघडकीस आले आहेत. रोहित रामखिलावन मिश्रा (24, रा. मझगवा, सरसवाडी, जि. उमरिया, सध्या रा. टिळेकरनगर, कोंढवा बद्रुक) आणि शिवम ओमकार तिवारी (19, आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांचे साथीदार शिवम सोनी (मुळ र. उत्तरप्रदेश) आणि वाल्मिकी शुक्ला यांचा पोलिस शोध घेत आहे.

शहरात मध्यरात्री एटीएम बुथ फोडून चोरीचा प्रयत्न करणारी टोळी सक्रीय झाली होती. टोळीकडून महाराष्ट्र बॅक, फायनान्स बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. बँकाच्या सीसीटिव्ही सर्व्हेलन्स आणि पोलिसांच्या गस्तीमुळे टोळीचा प्रयत्न पाच ते सहा वेळा फसला. त्या अनुषंगाने कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. टोळी पुन्हा असे गुन्हे करण्याची शक्यता पाहता तांत्रिकरित्या तपास केल्यानंतर काही जणांची नावे निष्पन्न झाली होती. पोलिस अमंलदार अमोल हिरवे, गणेश चिंचकर, निलेश देसाई यांनी फुटेज व तांत्रिक विश्लेषण करून रोहित मिश्रा याला एनआयबीएम रोडवरून तर शिवम तिवारीला गुजरातमधून बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत ग्रॅन्डर, कटावणी, हातोडा, स्क्रु ड्रायव्हर, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली. परिमंडळ 5 च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस कर्मचारी अमोल हिरवे, निलेश चिंचकर, निलेश देसाई, अभिजीत रत्नपारखी यांनी ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण हा सुरक्षारक्षकाचे तर एक कारागीर म्हणून काम करत होता. शॉर्टकट मार्गाने पैशा कमविण्याच्या हेतूने एकाच राज्यातील सर्व असल्याने त्यांनी योजनाबद्ध पध्दतीने एटीएम चोरीचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ग्रॅन्डर मशीनच्या साह्याने ते एटीमएम चोरीचा प्रयत्न करत होते.
– अनिल सुरवसे, सहायक पोलिस निरीक्षक, कोंढवा पोलिस ठाणे.

शहरात यापूर्वी एटीएम चोरीच्या घटना सातत्याने घडत होत्या. काही घटनांमध्ये तर थेट एटीएम गाडीत घेऊन जाण्याची व्यवस्था केली होती. पाच मिनिटात पूर्ण एटीएम मशीनच चोरी केली जात होती. काही ठिकाणी गॅस कटरच्या माध्यमातून एटीएम मशीन कट करून मशीनच चोरी झाल्याचे प्रकार घडले होते. मागील काळात या घटना काही प्रमाणात थांबल्या असताना पुन्हा एकदा एटीएम फोडण्याचे प्रकार समोर येऊ लागले होते. तसेच शहरात अशा टोळया सक्रीय झाल्याचे निदर्शनास आले होते. त्या पार्श्वभूमीवरच आता ही कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button