पिंपरी : नवरात्रोत्सवासाठी होतेय लाखो रुपयांची उलाढाल | पुढारी

पिंपरी : नवरात्रोत्सवासाठी होतेय लाखो रुपयांची उलाढाल

दीपेश सुराणा : 

पिंपरी : नवरात्रोत्सवासाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. कोरोनाचे मळभ सरल्याने यंदाचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. उत्सवानिमित्त घेण्यात येणार्‍या एका कार्यक्रमासाठी किमान पाच ते साडेपाच लाख इतका खर्च करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्सवापूर्वी दांडीया, गरबा नृत्याचे विविध प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. मंडळांकडून देवीसाठी आकर्षक आरास करण्यात आली आहे. त्यासाठीदेखील मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, बाजारपेठेतही नवरात्रोत्सवाची धामधूम पाहण्यास मिळत आहे.

उत्सवातील कार्यक्रमांचे अर्थकारण
नवरात्रोत्सव काळात घेण्यात येणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रामुख्याने दांडीया नृत्याचा विशेष कार्यक्रम आयोजित केला जात आहे. ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांच्याकडून प्रत्येकी 400 ते 500 रुपये इतके शुल्क आकारले जात आहे. तसेच, या कार्यक्रमात बेस्ट डान्स (पुरुष व महिला), बेस्ट कपल डान्स, बेस्ट वेशभुषा (पुरुष व महिला), बेस्ट ग्रुप अशी विविध बक्षिसे वितरित केली जाणार आहे. त्याशिवाय, यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे यासाठी आर्केस्ट्रा, होम मिनिस्टरसारखे कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. त्यामुळे एकीकडे दांडीया स्पर्धा होतानाच मनोरंजनाचाही ‘डोस’ मिळत आहे. या प्रत्येक कार्यक्रमाला किमान पाच ते साडेपाच लाख रुपये इतका खर्च येत आहे.

प्रशिक्षण वर्गांमध्ये तरुणाईचा सहभाग
कोरोनाचे निर्बंध हटल्याने यंदा नवरात्रोत्सवाची रंगत गरबा, दांडियाच्या खेळाने अधिकच वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच गरबा शिकविण्याचे प्रशिक्षण वर्ग गेल्या महिनाभरापासून शहरात सुरू आहेत. शहरातील शंभरपेक्षा अधिक डान्स क्लासेसमध्ये गरबा शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याशिवाय, काही कोरियोग्राफरनी स्वत: 3 ते 15 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग घेतले. या प्रशिक्षण वर्गाचा तरुण-तरुणी, महिला यांनी लाभ घेतला आहे.

भाडेतत्त्वावर वेशभूषेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी
गरबा नृत्यात बेसीक व विविध स्टेप्स शिकविण्यात आल्या. या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार्‍यांची संख्या, कालावधी यानुसार प्रति व्यक्ती किमान पाचशे ते 1 हजार रुपये इतके शुल्क आकारले गेले आहे.
तरुणी, महिला यांनी सुंदर नक्षीकाम असलेले घागरे, चनिया चोली यांची तर, तरुणांनी धोती-कुर्ता आदींची खरेदी केली आहे. ज्यांना प्रत्यक्ष खरेदी करणे शक्य झाले नाही, त्यांनी भाडेतत्त्वावर वेशभुषेचे साहित्य घेण्यासाठी ‘बुकींग’ करुन ठेवले आहे. त्यासाठी 24 तासाकरीता प्रति कपड्यासाठी 1 हजार रुपये मोजण्याची तयारी तरुणाईने ठेवली आहे.

देवीला आकर्षक आरास
उत्सवानिमित्त विविध मंडळांनी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तसेच, देवीला आकर्षक आरास केली आहे. त्याचप्रमाणे शहरातील देवीच्या विविध मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई, रंगरंगोटी केली आहे. तसेच, सजावटीवरदेखील विशेष भर देण्यात आला आहे. त्यावरही मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे.

नवरात्रोत्सवानिमित्त घेण्यात येणार्‍या कार्यक्रमांसाठी किमान पाच ते साडेपाच लाख इतका खर्च होत आहे. दांडीया नृत्याची स्पर्धा, बक्षीस वितरण, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असे नियोजन त्यासाठी करावे लागते. या कार्यक्रमांची तयारी किमान 25 दिवस आधी सुरू होते. दांडीया स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
                                       – सौरभ बेदमुथ्था, कार्यक्रम आयोजक

नवरात्रोत्सवानिमित्त चनिया चोली, घागरा, धोती-कुर्ता आदी कपडे 24 तासासाठी भाडे आकारुन दिले जातात. प्रत्येक कपड्यासाठी किमान एक हजार रुपयापर्यंत रक्कम देण्याची तयारी तरुणाईची असते. त्याचप्रमाणे, काही तरुण-तरुणी, महिला हे कपडे शिवुन घेण्यावरही भर देतात.
                                           – श्रद्धा दोशी, ड्रेपरी व्यावसायिक

Back to top button