पारगाव : लम्पीमुळे थोरांदळे येथे बैलांऐवजी ट्रॅक्टरपोळा | पुढारी

पारगाव : लम्पीमुळे थोरांदळे येथे बैलांऐवजी ट्रॅक्टरपोळा

पारगाव; पुढारी वृत्तसेवा: भाद्रपदी बैलपोळा गेली दोन वर्षे कोरोनामुळे रद्द झाला. यंदा कोरोना नियंत्रणात असताना सण आनंदाने साजरा करण्यास शेतकरी आसूसलेला होता. मात्र, लम्पी रोगाने या आनंदावर विरजण पडले, पण हार मानेल तो शेतकरी कसा? थोरांदळे (ता. आंबेगाव) गावात शेतकर्‍यांनी चक्क गावातील पन्नासहून अधिक ट्रॅक्टर सजवून त्यांची भव्य मिरवणूक काढून पोळ्याच्या आनंद लुटलाच.

यंदा भाद्रपदी बैलपोळ्याच्या सणावर जनावरांमध्ये आलेल्या लम्पी रोगाचे सावट पडले. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावागावात बैलांच्या मिरवणुका काढण्यास बंदी घातली. त्यामुळे शेतकर्‍यांचा अक्षरश: हिरमोड झाला. मात्र, थोरांदळेच्या शेतकर्‍यांनी एकत्र येऊन आपापल्यात काही रक्कम गोळा करून ट्रॅक्टरची भव्य मिरवणूक काढण्याचे ठरवले.

रविवारी (दि. 25) सकाळपासूनच शेतकर्‍यांनी आपापले ट्रॅक्टर धुवून, रंगीबेरंगी रिबीनने सजवून त्यावर गुलाल – भंडारा उधळून मिरवणुकीसाठी सज्ज केले. गावातील डोंगरावरील कुंभजाई माता मंदिरापासून ट्रॅक्टरच्या भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत तरुण शेतकर्‍यांचा सहभाग अधिक असल्याने साऊंड सिस्टीमचा वापर केला होता. पन्नासहून अधिक ट्रॅक्टर मालक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणूक संपल्यानंतर ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरासमोर सर्व ट्रॅक्टरची एकत्रित पूजा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. मातीच्या बैलांचीही विधिवत पारंपरिक पूजा करून मिरवणुकीची सांगता झाली.

Back to top button