वडापावविक्रेत्याला मारहाण करून लुटले; जुन्नर येथील घटना | पुढारी

वडापावविक्रेत्याला मारहाण करून लुटले; जुन्नर येथील घटना

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: जुन्नरमधील वडापाव हातगाडीचालकाला आठ-नऊ जणांनी मारहाण दमदाटी करीत एकाने चाकूने मानेजवळ मारहाण करीत गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची साखळी, वडापाव विक्रीचे सात हजारांची रक्कम काढून घेऊन ते सर्वजण पळून गेल्याप्रकरणी सर्वांविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शंकर खोत (रा शंकरपुरा पेठ, जुन्नर) यांनी फिर्याद नोंद केली असून, पोलिसांनी अक्षय मोहन बोर्‍हाडे (रा. शिरोली जुन्नर) व त्याच्या बरोबरच्या सात ते आठ अनोळखी इसमांविरोधात (भा.दं.वि. कलम 307, 327, 143, 147, 148, 149, 506) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

संतोष यांचे शहरातील भरबाजार पेठेत वडापाव सेंटर असून, ते सामानाची आवराआवर करत असताना अक्षय व अनोळखी सात-आठ जणांनी तेथे येऊन ‘तुझा भाऊ कुठे आहे, त्याला माज आला असून, अक्षयच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. ती माघारी घेण्यास सांग’, असे म्हणून अक्षय याने त्याच्या हातातील चाकू संतोष यास दाखवून ‘तुला संपवून टाकतो’, असे म्हणून चाकूने मानेला मारहाण केली. इतरांनी त्याला शिवीगाळ दमदाटी करीत छातीवर पाय देऊन त्याचा गळ्यातील सोन्याची पाच तोळ्यांची साखळी आणि वडापाव विक्रीचे सात हजार रुपये काढून घेऊन सर्वजण पळून गेले.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत. अक्षय बोर्‍हाडे याच्यावर तीन दिवसांपूर्वी आयटी अ‍ॅक्टनुसार जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भरबाजार पेठेत व्यापार्‍याला लुटीची ही घटना घडल्यानंतर व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button