पिंपरी : बाजारपेठेत खरेदीचा उत्साह, पुजा साहित्य व सजावट साहित्याला चांगली मागणी | पुढारी

पिंपरी : बाजारपेठेत खरेदीचा उत्साह, पुजा साहित्य व सजावट साहित्याला चांगली मागणी

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नवरात्रोत्सवाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये रविवारी खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह पाहण्यास मिळाला. देवीच्या पुजेसाठी लागणारे साहित्य, दांडीया, सुंदर नक्षीकाम असलेले राजस्थानी घागरे, चनिया चोली, धोती-कुर्ता आदींच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. सोमवारी घरोघरी घटस्थापना होणार आहे. त्याशिवाय मंदिरांमध्ये, सार्वजनिक मंडळांकडून देखील खास नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे.

त्यामुळे घटस्थापनेसाठी लागणारे पुजा साहित्य व सजावट साहित्याला चांगली मागणी असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये पाहण्यास मिळाले. कोरोनाची रुग्णसंख्या सध्या नियंत्रणात आहे. त्यामुळे नवरात्रोत्सव यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय साजरा होत आहे. हा सण यंदा दिमाखदारपणे साजरा करण्यावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीने आवश्यक तयारीला आज वेग आला होता.

साहित्य किंमत (रुपयांमध्ये)
पंचखाद्य पुडी 10
हळदी, कुंकू पुडी 10
सप्तधान्य पुडी 15
घट 30 ते 100
चौरंग 150 ते 700
तोरण 70 ते 3000
लटकन 100 ते 600
कृत्रिम फुलांचे पाकिट 150
झुंबर 100 ते 800
दांडीया 30 ते 100
देवीची चुनरी 60 ते 350

पूजा साहित्याची खरेदी
घटस्थापनेसाठी घट, माती तसेच सात प्रकारचे धान्य, हळदी, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, अखंड वात, कापुस, नारळ, कापूर, अगरबत्ती, मोळी धागा, देवीची चुनरी आदी पुजा साहित्याची खरेदी सुरू होती. त्याचप्रमाणे हवनासाठी लागणारे साहित्य, नवग्रह समिधा, काळे तीळ, जव, धुप, चौरंग, पणती, नारळ आदी साहित्याची देखील खरेदी सुरू होती.

सजावट साहित्याला मागणी
पिंपरी बाजारपेठेत यंदा सजावट साहित्याला चांगली मागणी होती. घरोघरी होणारी घटस्थापना तसेच, मंदिरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांकडून देवीला आकर्षक सजावट केली जात आहे. त्यासाठी कृत्रिम फुले, मोतीचे झुंबर, तोरण, लटकन आदी साहित्याला विशेष पसंती मिळत होती. अंगणात आकर्षक रांगोळी काढण्यासाठी विविध रंगांना महिला वर्गाकडून मागणी होती.

Back to top button