बावडा : घटस्थापनेसाठी कुंभारांकडे घटांना मागणी | पुढारी

बावडा : घटस्थापनेसाठी कुंभारांकडे घटांना मागणी

बावडा; पुढारी वृत्तसेवा: नवरात्रोत्सवानिमित्त घरोघरी घटस्थापना सोमवारी (दि.26) होत आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असणारे घट खरेदीसाठी कुंभारांकडे मागणी असल्याचे चित्र रविवारी (दि.25) पाहावयास मिळाले. घरोघरी देव्हार्‍यात माती टाकून त्या मधोमध घट ठेवून सोमवारी घटस्थापना होणार आहे. यावेळी मातीमध्ये विविध प्रकारचे धान्य टाकण्यात येते. घटामध्ये पाने व नारळ ठेवून त्यांना दोरी बांधून त्या दोरीला दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ बांधतात. घटामधील पाण्यामुळे मातीत टाकलेले धान्य जोमदार उगवून येते. दहा दिवसांनंतर दसर्‍याच्या दिवशी वाढ झालेले पीक हे घट उतरवून देवींना अर्पण केले जाते. एका घटाची विक्री किंमत सुमारे 15 ते 20 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

घट तयार करण्यासाठी कुंभार समाजातील व्यावसायिकांना मोठी मेहनत घ्यावी लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी उन्हाळ्यातच त्यांना हे घट तयार करून ठेवावे लागतात. त्यासाठी माती, घोड्याची लिद, राख हे मिश्रण एकत्र करून फिरणार्‍या चाकावर मातीचा गोळा तयार करून नंतर घट हाताने घडविले जातात. भट्टीमध्ये ते भाजले जाते. सध्या माती, घोड्याची लिद मिळवण्यात अडचणी येत आहेत.
घट तयार करणे खर्चिक झाले आहे, मात्र, परंपरेनुसार व्यवसाय म्हणून नेटाने पुढे चालवीत आहोत, असे कुंभार व्यावसायिक गोरख कुंभार (लाखेवाडी) यांनी सांगितले.

Back to top button