पुणे : सप्टेंबरअखेरपर्यंत आता दररोज प्रवेश; अद्यापही 36 हजारांवर जागा रिक्तच | पुढारी

पुणे : सप्टेंबरअखेरपर्यंत आता दररोज प्रवेश; अद्यापही 36 हजारांवर जागा रिक्तच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशासाठी आता 30 सप्टेंबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज प्रवेशाची संधी मिळणार आहे. अद्यापही 36 हजार 366 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. तीन नियमित व तीन विशेष प्रवेश फेर्‍यांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तरीदेखील अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. विशेष तिसर्‍या फेरीअखेर राज्यातील प्रवेशासाठी विद्यालय मिळू न शकलेले 11 हजार 462, प्रवेश न घेतलेले 1 हजार 222 असे एकूण प्रवेश न मिळालेले 12 हजार 684 विद्यार्थी आढळले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तसेच, यापूर्वी घेण्यात आलेल्या प्रवेश फेर्‍यांमध्ये अ‍ॅलॉटमेंट देत असताना केवळ एकच विद्यालय देण्यात आले होते.

त्यामुळे प्रत्येक फेरीमध्ये काही विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार महाविद्यालय मिळाले नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी आणि विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविलेल्या विद्यालयात प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीमधील स्थान समजावे, यासाठी दैनंदिन गुणवत्ता फेरी अर्थात सतत विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

दैनंदिन गुणवत्ता फेरी ही नावाप्रमाणे दररोज नवीन असेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळापत्रकात दिलेल्या वेळेत दररोज अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी एक दिवस मिळेल. त्या दिवसात प्रवेश न घेतल्यास त्या दिवसासाठी दिलेली पसंती रद्द समजली जाईल व पुन्हा अर्ज करता येईल. दैनंदिन गुणवत्ता फेरीमध्ये विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यालयाच्या प्रतीक्षा यादीतील त्याचे स्थान पाहता येईल.

निवड यादीत समाविष्ट असलेल्या विद्यालयात विद्यार्थ्यांना ‘प्रोसिड फॉर अ‍ॅडमिशन’ करून प्रवेशासाठी जाता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक विद्यालयांत प्रवेशाची संधी मिळू शकेल आणि पसंतीनुसार एकाची स्वतः निवड करता येणार आहे. दररोज पसंती आणि दररोज सुधारित गुणवत्ता यादी हे या प्रवेश फेरीचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक समजावून घेऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी केले आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रिया दृष्टिक्षेपात
एकूण महाविद्यालये 318
एकूण प्रवेशक्षमता 111750
एकूण नोंदणी 107423
कोटा प्रवेशक्षमता 15936
कोटांतर्गत प्रवेश 9689
कॅप प्रवेशक्षमता 95814
कॅप अंतर्गत अर्ज 76049
एकूण प्रवेश 75384
रिक्त जागा 36 हजार 366

 

 

 

Back to top button