पुणे : महाविकास आघाडीमुळेच ‘वेदांता’ राज्याबाहेर: उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका | पुढारी

पुणे : महाविकास आघाडीमुळेच ‘वेदांता’ राज्याबाहेर: उद्योगमंत्री उदय सामंत यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘वेदांता’ प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. मात्र, मागील आठ महिने हा प्रकल्प महाराष्ट्रात येण्यास इच्छुक असताना महाविकास आघाडी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच हा प्रकल्प राज्याबाहेर गेला, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. दी पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने व्यापारमहर्षी उत्तमचंदजी ऊर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीनिमित्त ‘आदर्श व्यापारी उत्तम’ पुरस्काराचे वितरण वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले, त्या वेळी सामंत बोलत होते.

कार्यक्रमास महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उद्योगपती प्रकाश धारिवाल, चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले आदी उपस्थित होते़. सामंत म्हणाले, ‘वेदांता’साठी गुजरातने चांगले प्रयत्न केले. महाराष्ट्रात आठ महिन्यांत मीटिंग झाली नाही.

ज्यांनी ‘वेदांता’ घालवला ते आज आंदोलन करीत आहेत. ‘वेदांता’ बाहेर गेल्याची खंत आम्हाला आहे. व्यापारी आणि उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे. ‘वेदांता’मुळे ज्या नोकर्‍या गेल्या, त्यापेक्षा जास्त नोकर्‍या निर्माण होतील.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने दहा लॉजिस्टिक पार्क आणि नऊ ड्रायपोर्ट सुरू करण्यात येत आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल, असेही त्यांनी सांगितले.

गांधी म्हणाले, ‘जगात सर्वाधिक सन्मान हा करदात्यांना दिला जातो. मात्र, भारतात वेगळे चित्र दिसून येते. व्यापार आणि उद्यागाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. येत्या आठवड्यात नवीन 16 प्रकल्प राज्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र चेंबरने पुढाकार घेतला आहे.’ ‘व्यापारी हे ग्राहकांना देव मानतात. कोणताही व्यवसाय करताना दर्जा महत्त्वाचा असतो तो व्यापारी जपतात. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव होत आहे ही चांगली बाब आहे,’ असे धारिवाल यांनी नमूद केले.

‘सध्याच्या काळात व्यापाराची पद्धती बदलली आहे. अनेक समस्या पारंपरिक बाजाराला भेडसावत आहेत. त्यामुळे सेस रद्द करावा. मालमत्ता कर कमी करावा,’ अशी मागणी बाठिया यांनी केली. या वेळी उषा अगरवाल, जवाहरलाल बोथरा, चोरडिया यांनी मनोगत व्यक्त केले. रायकुमार नहार यांनी स्वागत केले. आशिष दुगड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. ईश्वर नहार यांनी आभार मानले.

हे आहेत पुरस्काराचे मानकरी…
राज्यस्तरीय पुरस्कार रत्नागिरीचे सुहास पटवर्धन, पुणे जिल्हास्तरीय पुरस्कार सतीश चोरडिया, पुणे शहरस्तरीय पुरस्कार श्याम अगरवाल, चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार जवाहरलाल बोथरा आणि ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार हर्षद कटारिया यांना देण्यात आला़.

 

Back to top button