खडकवासला : महापालिका हद्दीत लम्पीचा पहिला बळी | पुढारी

खडकवासला : महापालिका हद्दीत लम्पीचा पहिला बळी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या हद्दीतील सिंहगड रोड परिसरातील नांदेड येथे लम्पी रोगाचा संसर्ग झाल्याने रविवारी सकाळी गायीचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील सिंहगड रोड, आंबेगाव, नर्‍हे, शिवणे, उत्तमनगर या भागांत लसीकरणाअभावी लम्पी रोगाची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुग्धव्यावसायिक चिंताग्रस्त झाले आहेत.

नांदेड येथील शेतकरी सारंग बबनराव देडगे यांच्या एका गायीचा लम्पी रोगाने मृत्यू झाला. देडगे यांच्या गोठ्यात तीसहून अधिक दुभत्या गायी तसेच बैल, वासरे आहेत. ते म्हणाले, ‘चार दिवसांपूर्वी एका बैलाला ‘लम्पी’ची लागण झाली होती. त्यामुळे सर्व जनावरांना लस देण्यात आली होती. बैल बरा झाला आहे. मात्र, नुकत्याच व्यायलेल्या गायीचा मृत्यू झाला.’ औंध येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शिंदे यांनी लम्पीमुळेच या गायीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे.

तलाठी संतोष चोपदार व महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने लम्पीप्रतिबंधक लसीकरण मोहीम नांदेड, खडकवासला, नांदोशी परिसरात सुरू केली आहे. सिंहगड रोड भागात लम्पीची लागण झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सिंहगड रोड, वडगाव धायरी, नांदेड, शिवणे, कोंढवे धावडे, उत्तमनगर परिसरात पाच हजारांहून अधिक म्हशी, गायी, बैल आदी जनावरे आहेत. या रोगाच्या भीतीने काही दुग्धव्यावसायिक खासगी डॉक्टरकडून गायी लम्पी प्रतिबंधक लस टोचून घेत आहेत.

Back to top button