

पुणे; पुढारी वृत्तसेवा: देशाच्या अर्थव्यवस्थेत पुणे शहराचे मोठे योगदान आहे. त्यामुळे या शहरासाठी नियोजित पुरंदर येथील नवे विमानतळ व रिंगरोड युद्धपातळीवर पूर्ण करू. तसेच पुण्याला चोवीस तास पाणी आणि भरपूर वीज देण्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करीत आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना दिले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्स्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर पुणे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी मराठा चेंबर्सचे अध्यक्ष सुधीर मेहता, नियोजित अध्यक्ष दीपक करंदीकर, एमसीसीएआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.
रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ..
पुण्यातील रिंगरोड पुण्याच्या पुढील 10 वर्षांच्या विकासाला चालना देईल. रिंगरोडसाठी 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, हा मार्ग येत्या 10 वर्षांत 1 ते 10 लाख कोटींचे मूल्य तयार करणारा ठरेल. हा रिंगरोड पुण्याच्या विकासाचे इंजिन ठरेल. या मार्गाच्या भूमी अधिग्रहणासाठी तज्ज्ञांकडून नावीन्यपूर्ण कल्पना आल्यास त्यांचे स्वागत केले जाईल.
पुण्यात मेट्रो रेल्वेच्या दोन टप्प्याचे काम वेगाने पुढे जात आहे. पुण्यातील औद्योगिक वातावरण पाहता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर 100 टक्के विद्युत वाहनाचा किंवा पर्यायी इंधनाचा उपयोग करणारे पहिले शहर व्हावे.
धरणाचे पाणी शेतकरी व नागरिकांना…
भविष्यात धरणातील पाणी थेट उद्योगांना न देता ते नागरिकांना आणि शेतीला दिले जाईल आणि शुद्धीकरण केलेले पाणी उद्योगांना दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पुण्याच्या शैक्षणिक संस्था आयआयटी आणि आयआयएम एवढ्याच उत्तम दर्जाचे शिक्षण देणार्या आहेत, असेही ते म्हणाले. शेतकर्यांची वीज आता सोलर फीडरवर जोडली जाणार आहे. त्यामुळेही भरपूर वीज उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
पुरंदर येथे विमानतळासोबत लॉजिस्टिक हब…
पुण्याच्या आर्थिक विकासात पुणे विमानतळाचे मोठे योगदान आहे. जगातील प्रमुख देश पुण्याशी जोडले गेले आहेत. पुणे येथून विमानाच्या फेर्या वाढविण्याची गरज आहे. विमानतळ एका मर्यादेहून अधिक क्षमतेने चालणं शक्य नसल्याने पुण्यासाठी नवे विमानतळ तयार करणे आवश्यक आहे. पुरंदर येथे नवे विमानतळ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथे विमानतळासोबत कार्गो आणि लॉजिस्टिक पार्क उभारण्याचाही विचार करण्यात येत आहे. नवी मुंबई विमानतळाला पुण्याशी जोडले जाईल, यामुळे पुण्याला त्याचा फायदा होईल.
गृहमंत्री जेलमध्ये असताना गुंतवणूक येईल कशी..
फडणवीस म्हणाले, गेली अडीच वर्षे राज्यात ज्यांचे सरकार होते, त्यांनी काय काम केले ते तुमच्या समोर आहे. आणि एक प्रकल्प गेला म्हणून ते आमच्या नावाने ओरड करीत आहेत. अहो, ज्या सरकारचा गृहमंत्री जेलमध्ये, पोलिस आयुक्त आणखी कुठे असतील तर कोणता उद्योग गुंतवणूक करायला धजावेल. आमच्या सरकारच्या काळात येत्या वर्षभरात गुंतवणुकीत महाराष्ट्र परत एकदा प्रथम क्रमांकावर असेल.