दापोडी : बाजारात घटस्थापनेसाठी खरेदीची लगबग | पुढारी

दापोडी : बाजारात घटस्थापनेसाठी खरेदीची लगबग

दापोडी : मागील दोन वर्षे कोरोनामुळे घातलेले निर्बंध यावर्षी हटविण्यात आल्यामुळे नवरात्रोत्सवात नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असून, बाजारात साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. गणेशोत्सवानंतर वेध लागतात ते नवरात्रोत्सवाचे. अवघ्या एका दिवसावर नवरात्रोत्सव येऊन ठेपला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या निर्बंधात हा उत्सव सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी निर्बंध हटविल्यामुळे धूमधडाक्यात उत्सव साजरा करण्यात येत आहे. जुनी सांगवी, नवी सांगवी, दापोडी, कासारवाडी, फुगेवाडी येथील ग्राहकांबरोबरच उत्पादक व व्यापार्‍यांनाही यंदाचा नवरात्रोत्सव पावणार आहे. यंदा घटस्थापना 26 सप्टेंबरला आहे. घरगुती व मंडळामध्येही दुर्गा देवीच्या मूर्तीसह घटस्थापना केली जाते. यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नऊ रंगांच्या साड्यांची खरेदी
यंदाचा गणेशोत्सव विनानिर्बंध साजरा करण्यात आला. त्याच धर्तीवरही आता नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्याची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. बाजारात फुले, फळे, हळद, कुंकू आदी साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. तसेच, नवरात्रोत्सवात नऊ रंगांच्या साड्यांची खरेदी करतानाही महिला दिसत आहेत.

फुलांचे दरही वाढणार
नवरात्रोत्सवात झेंडू व अन्य फुलांची खरेदी करण्यात येते. यंदा बाजारात फुलांचे दरही वाढणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे उत्पादकांना नवरात्रोत्सव पावणार असल्याचे दिसत आहे. परिसरातील अंबाबाईच्या मंदिरांही झळाळी आली आहे. तसेच, सोने-चांदीच्या अलंकाराची स्वच्छता केली जात आहे.

दरवर्षी घरात नऊ दिवस कडक उपवास केला जातो. त्याची तयारी आठ दिवसांपासून करीत असून, बाजारातून घटस्थापनेला लागणारे छोटे मातीचे मडके त्याला लागणारे कापड, कडधान्य, पत्रावळी इतर साहित्य खरेदी करण्यात येत आहे. मात्र, पूर्वीपेक्षा दुप्पट भाव वाढलेले दिसत आहेत.
                                          – छाया बोराडे, गृहिणी, पिंपळे गुरव

नवरात्रोत्सवात घटस्थापनेला लागणार्‍या साहित्यात दुप्पट वाढ झाली आहे. मार्केट यार्डात खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे. मात्र, वाढत्या महागाईत सध्या सर्वच साहित्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसत आहे. तरीही नवरात्रोत्सव असल्याने नागरिक खरेदी करीत आहेत.
                                 – संजय शिंदे, रानमळा पूजा भांडार, जुनी सांगवी

Back to top button