भादलवाडीजवळ जीवघेणा खड्डा | पुढारी

भादलवाडीजवळ जीवघेणा खड्डा

कळस; पुढारी वृत्तसेवा: पुणे-सोलापूर महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील खड्डा जीवघेणा ठरण्याची भीती स्थानिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हा खड्डा बुजविण्याकडे संबंधित टोल कंपनी दुर्लक्ष करत आहे. या खड्ड्यामुळे येथे अनेक किरकोळ अपघात झाल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते तानाजी जगताप यांनी सांगितले. जगताप यांनी सांगितले की, महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीकडे टोल कंपनी दुर्लक्ष करीत आहे.

रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्ता दुभाजकातील गवत कापणे, दुभाजकाला पट्टे ओढणे, गावांतील महामार्गालगतची गटार सफाई करणे आदी कामे वाहनचालक व नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. मात्र, भिगवण ते इंदापूर टप्प्यातील कामे दिरंगाईने होताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून भादलवाडी गावाजवळ सेवा रस्त्यावर पडलेला मोठा पडलेला आहे. या खड्ड्यांमध्ये अनेकदा दुचाकीस्वार पडून अपघातदेखील झाले आहेत.

महामार्गाच्या देखभालीवर नियंत्रण ठेवणे तथा मार्गदर्शन करण्यासाठी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाने एका खासगी कन्सलटंट कंपनीची नेमणूक केली आहे. मात्र, ही कन्सलटंट कंपनी व टोल कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. परिणामी, देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली लूट होत असून, या लुटीची झळ वाहनचालकांना बसत आहे.

Back to top button