परराज्यातील विद्यार्थ्यांचा स्थानिकांना होतोय त्रास; पौड रोड परिसरात समस्या | पुढारी

परराज्यातील विद्यार्थ्यांचा स्थानिकांना होतोय त्रास; पौड रोड परिसरात समस्या

पौड रोड; पुढारी वृतसेवा: महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे परराज्यातील अनेक विद्यार्थी विद्यापीठालगत असलेल्या रहिवासी परिसरात वास्तव्यास आहेत. परंतु यातील काही विद्यार्थी वेगवेगळी व्यसने करून रात्रंदिवस या परिसरात हैदोस घालत असल्याने स्थानिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिस प्रशासन लक्ष देईल का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. परिसरात लहान-मोठी हॉटेल रात्री उशिरापर्यंत चालू ठेवल्याने अनेक विद्यार्थी रात्रभर भटकंती करत असतात. तर काही ठिकाणी मुले, मुली सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताना दिसत आहेत. याचा परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

परराज्यांसह परदेशातील मुले, मुली शिक्षण्यासाठी पुण्यात येत असतात. ते या भागातील प्रॉपटी ब्रोकरांशी संपर्क साधून अनेक सोसायट्यांमध्ये फ्लॅट भाड्याने घेतात. मात्र, त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे न घेता जास्त कमिशनसाठी ब्रोकर या विद्यार्थ्यांना फ्लॅट उपलब्ध करून देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पौडरोड परिसरातील रस्त्यावर रात्रीच्या वेळी या विद्यार्थ्यांचा गोंधळ चालू असतो आणि अनेक संशयास्पद वाहने या रस्त्यावर ये-जा करत असतात. यामुळे हा परिसर स्थानिक नागरिकांना आता धोक्याचा वाटू लागला आहे. यामुळे या रस्त्यावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी होत आहे.

परराज्यातून शिक्षणासाठी परिसरात आलेले विद्यार्थी एकमेकांना शिवीगाळ करतात. तसेच परिसरात या विद्यार्थ्यांच्या वाहनांची रात्रीच्या वेळी वर्दळ असते. त्या वाहनांत ते विविध प्रकारची व्यसनेही करत असल्याचे आम्हाला दिसून येत आहे. यामुळे पोलिसांनी या विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

                                                                      – माया शिंदे, रहिवासी

परराज्यातील विद्यार्थ्यांच्या विविध कारणांमुळे त्रास होत असल्याबाबत मोहित शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर अपात्र गुन्हा दाखल केला आहे. परिसरात पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे.

                        – महेंद्र जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कोथरूड पोलिस ठाणे

 

Back to top button