पुणे : विकासकामे मार्गी लावणार: नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही | पुढारी

पुणे : विकासकामे मार्गी लावणार: नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मागील अडीच वर्षांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. आता माझ्यावर पुण्यासारख्या कुशल शहराच्या आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिल्याने रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यास आपले प्राधान्य असेल, अशी ग्वाही नवनियुक्त पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  राज्य सरकारमधील मंत्र्यांची शनिवारी सायंकाळी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली.

यामध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासारख्या कुशल शहराचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देऊन माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल त्यांचा आभारी आहे.

शहर आणि जिल्ह्यात भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी आणि रखडलेली विकासकामे पूर्ण करून सरकारबद्दल चांगली भावना वाढवण्याची माझ्यावर जबाबदारी दिली आहे. शहरातील मेट्रो, रिंगरोड, चांदणी चौकातील उड्डाणपूल, समान पाणीपुरवठा योजना, जायका, असे पायाभूत सुविधा देणारे प्रकल्प, शिक्षण क्षेत्रातील काही विषय मार्गी लावण्यास आपले प्राधान्य असेल.’

महापालिका निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘राज्यात आमचे सरकार नसते, तरीही पुणे महापालिकेची निवडणूक आम्ही जिंकणार होतो. तसा आमचा सर्व्हे सांगत होता. आता तर आमचे सरकार असल्याने सर्व परिस्थिती अनुकूल झाली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक जिंकणारच आहोत.’ मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस विलंब लागल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, की देशात आणि राज्यात मंत्रिमंडळ विस्तारासाठी विलंब झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आंदोलनावर बोलताना पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने कोणते कोणते प्रकल्प राज्यातून घालवले, याची यादी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच दिली आहे. अहंकारासाठी ठाकरे यांनी मुंबईची वाट लावली. आदित्य ठाकरे यांनी जाहीरपणे घटनाक्रम मांडावा, आक्रोश यात्रा ही स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारण्याचा प्रकार आहे. गेल्या सात-आठ वर्षांत तपास यंत्रणा प्रभावीपणे काम करत आहे, त्यामुळे देशात कोठेही बॉम्बस्फोट झालेले नाहीत. पाकिस्तान जिंदाबाद म्हणणार्‍यांवर कारवाई होईल, असेही पाटील म्हणाले.

Back to top button