कार्ला गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी | पुढारी

कार्ला गडावर नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

कार्ला : येथील जगप्रसिद्ध लेण्यात वसलेल्या श्रीआई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. परिसराची साफसफाई करण्यात आली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 26) मंदिरात घटस्थापना करण्यात येणार असून, महानवमीचा होम 4 ऑक्टोबर रोजी पहाटे होणार आहे, अशी माहिती एकवीरा देवस्थान प्रशासकीय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या नऊ दिवस चालणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात घटस्थापनेच्या दिवशी सकाळी सात ते आठ या वेळेत होणार आहे. आई एकवीरा व आई जोगेश्वरी देवीची पूजा करून घटस्थापना करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात येत आहे.

पायर्‍यांची दुरुस्ती करण्याची मागणी
गडावर तयारी पूर्ण झाली असली, तरी पायर्‍या दुरुस्ती व स्वच्छता ही कामे काहीशी अपूर्ण आहेत. प्रशासनाने याकरिता पुढाकार घ्यावा, तसेच पुरातत्त्व विभागाने दुरुस्तीवर कामे करण्याची मागणी केली जात आहे. भाविकांनी गडावर येताना तसेच खाली उतरताना गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दररोज पहाटे दुर्गा सप्तशतीचे पठण
आश्विन शु अष्टमीला दुर्गाष्टमीचे उपवास असून सर्वांत महत्त्वाचा होमहवन विधी रात्री अकरा वाजता सुरू होणार असून, पूर्णाहुती पहाटे पाच वाजता करून उत्सवाची सांगता करण्यात येणार आहे. दरम्यान, या नऊ दिवसांच्या काळात गडावर दररोज पहाटे दुर्गा सप्तशतीचे पठण करण्यात येणार आहे.

 

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले असून, भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, आई एकवीरा देवी मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई तसेच भाविकांच्या दर्शन रांगेवरती मंडप तथा पुष्प सजावट करण्यात आली आहे.
                                                              – मंगेश गायकवाड, मंदिर व्यवस्थापक

 

कडक पोलिस बंदोबस्त
पोलिस प्रशासनाकडून मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दर्शन रांगांची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने गडावर बांधलेले स्वच्छतागृह मागील काही महिन्यांपासून बंद आहे. ते खुले करावे, अशी मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.

Back to top button