पिंपरी : आजोबांचे ऑपरेशन करा, असे म्हणत डॉक्टरला मारहाण; गुन्हा दाखल | पुढारी

पिंपरी : आजोबांचे ऑपरेशन करा, असे म्हणत डॉक्टरला मारहाण; गुन्हा दाखल

पिंपरी : आत्ताच्या आता आजोबांचे ऑपरेशन करा, असे म्हणत नातवाने रुग्णालयातील सहायक वैद्यकीय अधिकार्‍याच्या कानशिलात लगावली. याप्रकरणी नातवावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री पावणे दहाच्या सुमारास डॉ. डी वाय पाटील मेडिकल हॉस्पिटल, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी डॉ. शिवाप्पा रविंद्र देवरमनी (26, रा. पिंपरी. मूळ रा. कर्नाटक) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुर्गेश राजन पुराणीक (28, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटलमध्ये सहायक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करतात.

दरम्यान, आरोपी दुर्गेश हा त्याचे आजोबा कालिदास गजानन पुराणिक (96, रा. मोशी) यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. कालिदास पुराणिक यांच्यावर उपचार करण्यासाठी फिर्यादी त्यांना घेऊन जात होते. त्यावेळी आरोपीने पेशंटला कुठेही न्यायचे नाही. तेवढी गरज असेल, तर तुमच्या कार्डियाक डॉक्टरांनाच इथे बोलवा. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या आजोबांचे ऑपरेशन करा, असे म्हणून दुर्गेश याने फिर्यादी यांच्या कानशिलात लगावली. तसेच. जोरजोरात शिवीगाळ करून गोंधळ घेतला. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

 

Back to top button