कांदा प्रक्रिया उद्योगावरून राजकारण? राष्ट्रवादीचे आंदोलन भावना भडकवण्यासाठी; भाजपचा आरोप | पुढारी

कांदा प्रक्रिया उद्योगावरून राजकारण? राष्ट्रवादीचे आंदोलन भावना भडकवण्यासाठी; भाजपचा आरोप

लेण्याद्री; पुढारी वृत्तसेवा: कांदा पिकाच्या अनियमित दरांबाबत, निर्यात धोरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने मागील आठवड्यात ओतूर येथे माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार अतुल बेनके, सभापती संजय काळे व विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या उपस्थितीत आंदोलन केले होते. राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती. आता राज्यातील सत्ताधा-यांनीही पलटवार केला असून, राष्ट्रवादीकडून सत्ता असताना या विषयावर मार्ग काढण्याऐवजी आता केवळ शेतकर्‍यांना भडकावत असल्याचा हल्लाबोल केला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कांदा 8 ते 10 प्रतिकिलो दराने बाजारात विकला जात होता. या दरांमध्ये गेल्या आठवड्यात थोडीशी वाढ झाली आहे. जुन्नर तालुक्यात गेल्या वर्षी 11,500 हेक्टरवर कांदा लागवड होती. दरवर्षी क्षेत्र वाढतच असते. साधारणतः दरवर्षी मार्च ते सप्टेंबर या काळात कांद्याचे दर कमी होतात. त्यात यंदा श्रीलंकेतील आर्थिक मंदी, बांगलादेश, पाकिस्तानमधील महागाईमुळे कांदा निर्यात खूपच कमी झाली. यावर्षी देशांतर्गत आवक नेहमीप्रमाणे वधारली, मात्र मालाला वरील कारणांमुळे मागणी नसल्यामुळे भाव रोडावल्याचे चित्र आहे. निर्यात बंदी, त्यावरील कर आदी केंद्रीय मुद्द्यांवर जुन्नरला झालेल्या आंदोलनात टीका करण्यात आली.

उत्पादन जास्त असूनही मातीमोल भाव
दरवर्षी तालुक्यात सुमारे 3 लाख टन कांदा उत्पादीत होतो. बाजार समितीच्या तीन केंद्रांत जमा होणारा हा कांदा आंध—प्रदेश, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक तसेच मुंबईमार्गे व्हिएतनाम, दुबई, लंडन, श्रीलंका आदी देशांमध्ये जातो. मागील दोन वर्षे कोरोनाने शेतकर्‍यांना दमविले होते. उत्पादन खर्च मिळत नसल्याने शेतकरी भाववाढीच्या आशेने कांदा चाळीत साठवत होते. मात्र मागणी व पुरवठा गणित बिघडल्यामुळे अपेक्षित भाववाढ झालीच नाही. परिणामी तालुका किंवा जिल्ह्यात मोठा कांदा प्रक्रिया उद्योग असावा, अशी शेतकर्‍यांची जुनी मागणी आहे.

गुजरात, भावनगरप्रमाणे प्रक्रिया उद्योग आवश्यक
जुन्नर, आंबेगाव, खेड तसेच नाशिक जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तालुक्यात कांदा प्रक्रिया उद्योग उभारल्यास कच्चा माल आणण्यासाठीचा दळणवळणाचा खर्च फारच कमी होणार आहे. उद्योगासाठी कटिंग मशीन, ड्रायर, ग्राइंडिंग मशीन, पॅकेजिंग मशीनची आवश्यकता असते. कांदा चाळीसाठी कोट्यवधींचे अनुदान वाटले जात असताना या उद्योगासाठीही कृषी विभागाने योजना आखणे गरजेचे आहे. गुजरातमधील महुआ, भावनगर परिसरात असे अनेक कारखाने असून येथे बनणार्‍या कांदा पावडर, पेस्ट व इतर उत्पादनांना जगभरात मोठी मागणी आहे.

शेतकर्‍यांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणारा हा कांदा प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुक्यातील विविध पक्षांचे नेते किंवा शेतकरी संघटनांनी पुढाकार घेतल्यास हे सहज शक्य आहे. हा उद्योग उभारल्यास ग्रामीण भागतील अर्थचक्र वेगाने फिरून कांदा उत्पादकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

                                              रामभाऊ वाळुंज, कांदा उत्पादक, खानापूर (ता. जुन्नर)

Back to top button