पिंपरी : 938 बेघर कुटुंबीयांना मिळणार सदनिका, महापालिकेने मागविले अर्ज | पुढारी

पिंपरी : 938 बेघर कुटुंबीयांना मिळणार सदनिका, महापालिकेने मागविले अर्ज

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 938 बेघर कुटुंबीयांना सदनिका देण्यात येणार आहे. पिंपरी आणि आकुर्डी येथील गृहप्रकल्पात ही घरे देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत आकुर्डी एचडीएच (बेघरांसाठी घरे) आरक्षण क्रमांक 283 आणि पिंपरी एचडीएच आरक्षण क्रमांक 77 येथे गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.

‘बेघरांसाठी घरे’ या प्रयोजनांतर्गत पिंपरी येथे 370 तर, आकुर्डी येथे 568 सदनिका उभारण्याचे काम सुरू आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विकसित झालेल्या सदनिका या महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील आरक्षणाने बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांना वितरित केल्या जाणार आहेत. त्यासाठी अर्जासह आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या चिंचवडगाव येथील झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चालू रेडीरेकनर दरानुसार होणार मूल्यांकन
मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास हा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिला जाणार आहे. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर नागरिकांच्या आरक्षण बाधित क्षेत्राचे चालू रेडीरेकनर दरानुसार मुल्यांकन करण्यात येणार आहे. महापालिकेच्या नगररचना व विकास विभागाकडून त्याचे मुल्यांकन करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे
जागेचा सातबारा उतारा अथवा मालमत्ता पत्रक उतारा, उत्पन्न दाखला, खरेदीखत दस्त, आरक्षणाने बाधित जागेचा शासकीय मोजणी नकाशा, शासकीय मोजणी नकाशावरील विकासयोजना अभिप्राय, 30 वर्षांचे सर्च व टायटल रिपोर्ट, महापालिकेकडून देण्यात आलेली अनधिकृत रस्ताबाधित जागेची नोटीस.

Back to top button