पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर असलेल्या जुना जिना रेल्वे प्रशासनाच्या वतीने शनिवारी पाडण्यात आला. हा जिना खूपच जुना झाला होता. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून हा जिना पाडण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि नव्या पूलाला येथून नवा जिना जोडण्यासाठी गेल्या काही दिवसापुर्वी जिना पाडण्याचे काम हाती घेतले होते. त्यामुळे गेले काही दिवसांपासूनच 6 नंबर प्लॅटफॉर्मवरील जिना पाडण्याचे काम सुरू होते. शनिवारी अखेर जुना जिना पाडण्यात आला. आता येथे रेल्वे प्रशासनाकडून नवा जिना उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
नवीन जिना बनविण्यासाठी जुना जिना शनिवारी तोडण्यात आला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून पूर्वी प्रवाशांना थेट पुलावर जाता येत नव्हते. आता नव्याने उभारण्यात येणारा जिना पुलाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता आगामी काळात प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरून पुलावर जाता येणार आहे.
– मनोज झंवर,
जनसंपर्क, अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग