पुणे : शिवसेनेचा डाव रडीचाः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन | पुढारी

पुणे : शिवसेनेचा डाव रडीचाः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रासाठी केंद्राने मंजूर केलेले अनेक मोठ्या प्रकल्पांना शिवसेनेने विरोध केला. आता वेदांता फॉक्सकॉनचे अपयश झाकण्यासाठी रडीचा डाव खेळत आहेत, अशी टीका केंद्रीय अर्थमंत्री तथा भाजपच्या नेत्या निर्मला सीतारामन यांनी यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत केली.  बारामतीच्या विकासकामांचे कौतुक भाजप नेत्यांनी यापूर्वी केले आहे. या विकासाबद्दल तुम्हांला काय वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चमकून सीतारामन म्हणाल्या, ‘ज्यांनी सहकारात चांगले काम करणे अपेक्षित होते, त्यांनी सहकार क्षेत्राचा वापर केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी स्वतंत्र सहकार मंत्रालयासाठी प्रयत्न केलेच नाहीत. ते मोदी सरकारने करुन दाखवले.’

केंद्राच्या 70 टक्के योजना पोहोचल्या..
केंद्र शासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याची प्रभावी अमंलबजावणी होणे अपेक्षित आहे. पुणे जिल्ह्यात 60 ते 70 टक्के लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचल्या असून, त्या 100 टक्के कधी पोहोचणार, असा सवाल यंत्रणांना केला आहे, असे सीतारामन यांनी प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

रूपी बँकेबाबत अभ्यास सुरू
रूपी बँकेबाबत काय निर्णय झाला, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, रूपी बाबत रिझर्व बँकेला काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत अभ्यास सुरू आहे. अजून ठोस निर्णय झालेला नाही.

बारामतीत घेतला कार्यकर्त्यांचा अभिप्राय..
बारामती लोकसभा मतदार संघात भाजपचा खासदार निवडून येईल का या थेट प्रश्नाचे उत्तर देणे टाळत त्या म्हणाल्या, मी माझा पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी तीन दिवसांचा दौरा केला आहे. तसेच केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला का, याची माहिती घेतली. यासह पक्षाच्या कार्यकत्र्यांचा अभिप्राय जाणून घेतला.

महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत…
महागाईचा दर 4 टक्क्यांवर स्थिर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नुकतेच खाद्यतेलावरील आयात कर केला आहे. तसेच डाळीच्या निर्यातीवरील निर्बंधही खुले केले आहे. त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत झाली आहे.

Back to top button