पुणे : गड्या…आपली लालपरीच बरी, उत्पन्नात सुसाट;  शिवशाही, शिवनेरी गाड्यांपेक्षा पाचपट कमाई

पुणे : गड्या…आपली लालपरीच बरी, उत्पन्नात सुसाट;  शिवशाही, शिवनेरी गाड्यांपेक्षा पाचपट कमाई

प्रसाद जगताप
पुणे : गरिबांचा रथ म्हणून समजल्या जाणार्‍या 'लालपरी'नेच अखेर एसटी महामंडळाला तारले असून, शिवनेरी व शिवशाही या गाड्यांना मागे टाकत पुणे विभागात विक्रमी 110 कोटी उत्पन्न मिळवून दिले आहे. सर्वसामान्य नागरिक लांबचा प्रवास करायचा असेल, तर अजूनही एसटीतून प्रवासालाच प्राधान्य देतात. कोरोनाकाळ आणि एसटी संपाच्या काळात एसटीच्या गाड्या बंद झाल्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले होते. मात्र, आता एसटीची सेवा पूर्वपदावर आली आहे.

एसटीच्या स्थापनेपासून लाल रंगाच्या बसला 'लालपरी' कौतुकाने म्हटले जाते आणि एसटी म्हटली की लाल रंगाची बस डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र, बदलत्या काळानुसार खासगी व्यावसायिकांच्या आरामदायी लक्झरी बस वाढल्या अन् लालपरीला आव्हान उभे राहिले. या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटीने शिवनेरी, शिवशाही, अश्वमेध या गाड्या सुरू केल्या. त्यालाही प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला. परंतु, एसटीचा कणा लालपरीच असल्याचे प्रवासीसंख्या, मिळालेले उत्पन्न यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर दिसून आले आहे.

अगदी दुर्गम भागात सेवा देण्यास लक्झरी बस अपुर्‍या पडतात आणि सेवा देण्यास मर्यादा येतात. लालपरी दुर्गम अशा खेड्यापाड्यांत पोहचली आहे. त्यामुळे खासगीकरणाच्या या रेट्यात लालपरीनेच एसटीला अजूनही आधार दिल्याचे चित्र दिसून येत आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2022 या पाच महिन्यांच्या काळात प्रवाशांनी शिवनेरी, शिवशाही आणि हिरकणी या गाड्यांपेक्षा लालपरीतून अधिक प्रवास केला. त्याद्वारे एसटीच्या पुणे विभागाला एकूण 163 कोटी 98 लाख 3 हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. यातील 110 कोटींचे उत्पन्न फक्त लालपरीनेच मिळवून दिले आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशी सेवा पुरविण्यावर भर द्यावा, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

कोरोनानंतर एसटीची सेवा पूर्वीप्रमाणे सुरू झाली आहे. महामंडळाच्या सर्व बसगाड्यांना पूर्वीप्रमाणेच प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून, यात लालपरीसह सर्व बसगाड्या प्रवाशांच्या वाहतुकीसाठी सज्ज आहेत. नागरिकांनी एसटीच्या माध्यमातून प्रवास करण्यावर भर द्यावा.
                      – ज्ञानेश्वर रणावरे, विभागीय वाहतूक अधीक्षक, एसटी, पुणे विभाग

पाच महिन्यांतील उत्पन्न
लालपरी – 110 कोटी 1 लाख 56 हजार रुपये
शिवनेरी – 20 कोटी 89 हजार रुपये
शिवशाही – 24 कोटी 50 लाख 78 हजार रुपये
हिरकणी (हिरकणी) – 7 कोटी 61 लाख 32 हजार रुपये
मिडी बस – 1 कोटी 24 लाख 75 हजार रुपये
एकूण उत्पन्न – 163 कोटी 98 लाख 3 हजार रुपये

एसटीच्या गाड्यांची संख्या
लालपरी – 482
शिवनेरी – 66
शिवशाही – 79
स्लीपर – 02
शिवाई – 01
मिडी – 15
एकूण बस – 652

कर्मचारी संख्या
चालक – 1399
वाहक – 1256
कार्यालयीन/अभियांत्रिकी कर्मचारी – 1595
विभागातील एकूण कर्मचारी – 4 हजार 250

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news