शेतकर्‍याने काढली बैलाची अंत्ययात्रा; शिक्रापूर येथील कुटुंबाने जपली माणुसकी | पुढारी

शेतकर्‍याने काढली बैलाची अंत्ययात्रा; शिक्रापूर येथील कुटुंबाने जपली माणुसकी

शिक्रापूर; पुढारी वृत्तसेवा: राऊतवाडी येथे पंढरीनाथ राऊत या शेतकर्‍याच्या नाथा बैलाचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या शेतकर्‍याने संबंधित बैलावर पुष्पवृष्टी करीत अंत्ययात्रा काढून बैलाचे विधिवत पूजन करीत अंत्यविधी केला. या वेळी शेतकर्‍याच्या संपूर्ण कुटुंबाला अश्रू अनावर झाले होते. शिक्रापूर येथील पंढरीनाथ राऊत यांच्या गोठ्यात फेब्रुवारी 1995 मध्ये नाथाचा जन्म झाला. त्यानंतर त्याला बैलगाडा शर्यतीचे धडे देण्यात आले.

नाथाने शिरूर, आंबेगाव, खेड, मावळ तालुक्यांतील अनेक ठिकाणच्या बैलगाडा शर्यतींत भाग घेत असंख्य बक्षिसे मिळवत ‘हिंदकेसरी’सह ‘घाटाचा राजा’ हा किताब मिळविला. बैलगाडा शर्यतींमध्ये अतिशय चपळ असणार्‍या नाथाने कधीच कोणाला मारले नाही. अतिशय चपळ; मात्र शांत असलेला नाथा राऊतवाडीतील प्रत्येक घरातील लोकांना आपलासा वाटत होता. अनेक धार्मिक कार्यक्रमांत रथ ओढणे, परण्या, मांडवडहाळे, मिरवणुकीच्या कार्यक्रमात त्याला आवडीने नेले जात असे.

शनिवारी (दि. 24) पहाटेच्या सुमारास नाथाचे वृद्धापकाळाने निधन झाले अन् राऊत कुटुंबीय शोकसागरात बुडाले. या वेळी पंढरीनाथ राऊत, बाळासाहेब राऊत, एकनाथ राऊत, दत्तात्रय राऊत, गणेश राऊत, उद्धव बालवडे, अमोल राऊत, दादा खेडकर, सीताराम कळमकर, राकेश गायकवाड, अक्षय वाबळे, ओमकार भूमकर, सोमनाथ राऊत यांसह अनेक बैलगाडा संघटनेचे गाडामालक तसेच गाडाप्रेमी युवक सहभागी झाले होते.

Back to top button