जुन्नर शहरातून बिबट्या जेरबंद

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा: शहरातील नागरी लोकवस्ती असलेल्या अगर पेठ येथे लावलेल्या पिंजर्यामध्ये शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी सुमारे तीन वर्षांचा बिबट्या जेरबंद करण्यात जुन्नर वन विभागाला यश आले आहे. या भागात बुधवारीही (दि. 21) एक बिबट्या जेरबंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून आढळून येणारे दोन बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. हे दोन बिबटे जेरबंद होत असतानाच शहरातील कल्याण पेठ भागात मुंढे शाळेलगत असणार्या नंदनवन सोसायटीच्या वाहनतळामधून शुक्रवारी रात्री 9 दरम्यान बिबट्याने भिंतीवरून आतमध्ये येत तेथील कुत्रे पळविल्याने या इमारतीमधील नागरिकांमध्ये भीतीचे
वातावरण आहे.
या भागात नागरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून, गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन तेथील नागरिकांना वारंवार होत होते. या तीन दिवसांत दोन बिबटे जेरबंद करण्यात आल्यामुळे तेथील नागरिकांना असलेला धोका टळला असला, तरी वन विभागाच्या वतीने आणखी काही दिवस कर्मचारी दिवसातून तीन-चारवेळा जाऊन परिस्थितीचे निरीक्षण करणार असल्याचे वनपाल नितीन विधाटे यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील कल्याण पेठ कृष्णराव मुंढे शाळेलगत नंदनवन ही मोठी निवासी इमारत असून, शुक्रवारी रात्री 9 च्या दरम्यान इमारतीच्या भिंतीवरून बिबट्याने आत प्रवेश करीत तेथील वाहनतळात बसलेल्या कुत्र्याला पळवून नेले. या इमारतीमध्ये 90 कुटुंबे राहण्याकरिता असून, या घटनेमुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या इमारतीत शासकीय अधिकारी, शिक्षक, नोकरदार राहण्याकरिता आहेत. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या इमारतीमध्ये ही घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जुन्नर शहरात एकाच दिवशी बिबट्याच्या या दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.