खोर : खट्टा बहारचे पहिले अंजीर मुंबईत दाखल | पुढारी

खोर : खट्टा बहारचे पहिले अंजीर मुंबईत दाखल

खोर; पुढारी वृत्तसेवा: संपूर्ण राज्यात नामांकित असलेले दौंड तालुक्यातील खोर येथील स्वादिष्ट, रसरशीत, गोड असे खट्टा बहारचे पहिले अंजीर मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाले आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी यादरम्यान खोरच्या परिसरात अंजिराचा ’खट्टा बहार’ घेतला जातो. या वर्षी लवकरच हा बहार धरला गेला आहे. त्यामुळे या बहाराला सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने बागांनी देखील चांगल्या प्रकारचा बहार धरला आहे. या भागातील ‘अंजीररत्न’ पुरस्कारप्राप्त शेतकरी समीर डोंबे यांनी घेतलेला अंजिराचा ’पवित्रक’ जातीचा खट्टा बहार शुक्रवारी (दि. 23) मुंबईच्या बाजारपेठेत दाखल झाला.

अतिशय दर्जेदार व रुचकर व रसरशीत गोड वाण असलेले अंजीर ग्राहकांना अगदी पाहता क्षणी पसंत पडत आहे. या अंजिराला मोठी मागणी आहे. समीर डोंबे यांनी मुंबईच्या मॉलमध्ये ग्राहकवर्गासाठी विविध आकर्षक पॅकेजिंगमधून अंजीर दाखल केले आहे. अंजिराचे पाहिले वाण पाहण्यासाठी ग्राहकवर्गाने देखील गर्दी केली असून, अंजीरला मनपसंती दर्शविल्याचे समीर डोंबे यांनी सांगितले आहे.
ग्राहकांची मानसिकता लक्षात घेऊन ‘पवित्रक’ या नावाने फळांची गुणवत्ता, नैसर्गिक चव तसेच रसायन अंशमुक्त फळ, यामुळे अल्पावधीतच मोठ्या नामांकित कंपन्यांसोबत काम सुरू करण्यात येणार आहे.

अंजीर या फळापासून फूड प्रोसेस करून अंजीर जाम तसेच अंजिराची वाईन लवकरच ग्राहकांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे समीर यांनी सांगितले. खोरला 350 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर अंजिराची लागवड असून, जवळपास 70 ते 80 टक्के शेतकरी ‘खट्टा बहारा’चा हंगाम घेतात. ‘पूना फिग’ जातीची अंजीर लागवड देखील या भागात केली जाते. या भागातील अंजिराचा दर्जा उत्कृष्ट असल्याने यंदा चांगली आर्थिक उलाढाल होईल, अशी अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करीत आहेत.

Back to top button