पुणे : पोलिस झालेला तोतया शिपाई जेरबंद; जिल्हाधिकारी कार्यालयात करत होता नोकरी | पुढारी

पुणे : पोलिस झालेला तोतया शिपाई जेरबंद; जिल्हाधिकारी कार्यालयात करत होता नोकरी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पोलिस असल्याची बतावणी करून बनावट ओळपत्र जवळ बाळगल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील एका शिपायाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली. नीलेश चांगदेव जाधव (वय 41, रा. गणेशनगर , औंध, कॅम्प पुणे) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिस कर्मचारी आण्णा केकाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांनी सांगितले, आरोपी नीलेश जाधव हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिपाई म्हणून नोकरीला आहे. काही दिवसांपूर्वी त्याला बसमध्ये प्रवासात पोलिसाचे ओळखपत्र सापडले होते. त्याने त्याच्या झेरॉक्स काढून त्याच्यावर स्वतःचा फोटो चिटकवून बनावट ओळखपत्र तयार केले. त्यानंतर पोलिसाची टोपी खरेदी केली. तसेच तो पायात पोलिसासारखाचा बूट आणि स्वॉक्स घालत होता. पोलिस लिहिलेली तीन खोटी ओळखपत्रे त्याच्याकडे मिळून आली आहेत.

दरम्यान शुक्रवारी त्याने सिंहगड रोड परिसरातील एका पानटपरीवरून पानमसाला पोलिस असल्याचे सांगून घेतला होता. तसेच एका हॉटेलमध्येदेखील नाश्ता केला होता. पोलिस कर्मचारी केकान यांना याबाबत माहिती मिळाली होती.त्यानुसार त्यांनी जाधव याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी तो स्वतः पोलिस असल्याचे भासवतो आहे, हे निदर्शनास आले. पोलिस चौकीत आणून सखोल चौकशी केली तेव्हा हा प्रकार समोर आला.

Back to top button