इंदापूर : भारत जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन होईल: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन

File photo
File photo
Published on
Updated on

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा: कोविडच्या जागतिक संकटानंतर जगातील सर्वाधिक गतीने भारताची अर्थव्यवस्था विकसित होत असून, जगाच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्जीवनासाठी भारत इंजिन म्हणून काम करेल, असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काढले. इंदापूर येथे शनिवारी (दि.24) डॉक्टर, वकील, व्यापारी, व्यावसायिक, नवमतदार व युवकांशी त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी निर्मला सीतारामन बोलत होत्या. सीतारामन पुढे म्हणाल्या, सरकारपुढे रोजच्या वापरातील वस्तूंची महागाई कमी करणे हे एक आव्हान आहे. मात्र, त्यावर केंद्र सरकार काम करत असून महागाई आटोक्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

नागरिकांनी देखील महागाईची प्रमुख कारणे समजून घेतली पाहिजेत. परदेशातून आयात करणार्‍या वस्तूंची किंमत वाढली की, महागाई वाढत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आग्रह असतो. आयात करणार्‍या रसायनिक खतांच्या एका गोणीची किंमत तीन हजार रुपयांवर गेली होती. मात्र, त्याचा आर्थिक भार शेतकर्‍यांवर पडू नये यासाठी पंतप्रधान मोदी यांनी खास सूचना केल्या आहेत.

जीएसटीबाबत नेहमी अपप्रचार केला जातो, त्यासाठी केंद्राला जबाबदार धरले जाते, मात्र त्याची सत्यता पडताळून पाहिली जात नाही. जीएसटीचे निर्णय घेण्यासाठी सर्व राज्यांचे अर्थमंत्री व केंद्र सरकार यांची संयुक्त जीएसटी परिषद निर्णय घेत असते, त्यानुसार अभ्यास करून जीएसटीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जातो. मात्र, याचे सर्व खापर केंद्रावर फोडले जाते, हे योग्य नाही, असे निर्मला सीतारामन यांनी भाषणात नमूद केले.

या वेळी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉक्टर प्रतिनिधी डॉ. संदेश शहा, वकील प्रतिनिधी अ‍ॅड. कृष्णाजी यादव, व्यापारी प्रतिनिधी नंदकुमार गुजर आदींनी वेगवेळ्या समस्या मांडल्या. या सर्व समस्यासंबंधी नवी दिल्लीत गेल्यावर संबंधित खात्याकडून अभ्यास करून चांगले निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

कार्यक्रमास आ. राम शिंदे, आ. राहुल कुल, आ. भीमराव तापकीर, गणेश भेगडे, पृथ्वीराज जाचक, अंकिता पाटील-ठाकरे, राजवर्धन पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, अर्थमंत्री सीतारामन या हर्षवर्धन पाटील यांच्या भाग्यश्री निवासस्थानापासून दुचाकी रॅलीसह इंदापूर शहरवासीयांना अभिवादन करीत गुरुकृपा सांस्कृतिक सभागृहापर्यंत दाखल झाल्या. प्रास्ताविक भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. शरद जामदार यांनी केले, तर आभार शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी मानले.

दिवाळीपूर्वी पेट्रोलचे दर कमी होतील
पेट्रोलच्या सततच्या दरवाढीमध्ये पंतप्रधानांनी लक्ष घालून दर कमी करण्याच्या सूचना केल्याने जूनमध्ये पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. दिवाळीपूर्वी दर आणखी कमी होणार असल्याचे सूतोवाच निर्मला सीतारामन यांनी केले. मात्र, हे दर नेहमी कमी- जास्त होत असतात, कारण जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर वाढले की, पर्यायाने त्याचा परिणाम आपल्या बाजारपेठेवर होतो, त्यामुळे ही वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news