

रामदास डोंबे
खोर : पुरंदर तालुक्यात होणारे नियोजित विमानतळ हे हाकेच्या अंतरावर असून, 'चला…चला…चला….1 लाख रुपये भरा, आणि आजच आपली हक्काची जागा बुकिंग करा', असा उच्छाद घालणार्या डेव्हलपर्स व बिल्डर लोकांनी शेतकरी व ग्राहकवर्गाची लाखो रुपयांची लूट करण्याचे काम सध्या चालवले आहे. याकडे प्रशासनाने डोळस वृत्तीने पाहणे गरजेचे झाले आहे.
सध्या दौंड तालुक्यातील भांडगाव, खोर, देऊळगावगाडा परिसरात असा गोरखधंदा सुरू आहे. विविध माध्यमांचे आमिष दाखवून फलक लावून यामध्ये ठळक वैशिष्ट्ये यामध्ये दाखवली जात आहेत. या ठळक वैशिष्ट्येच्या भूलथापांना बळी पडून अनेक जणांचा कल या बेकायदेशीर प्लॉटिंगकडे वळला गेला आहे. पुरंदर तालुक्यातील विमानतळ हे होणार की नाही, यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र इकडे दौंड तालुक्यात, पुरंदर तालुक्यात विमानतळ झाले आहे, असेच दाखवण्याचा प्रयत्न केला जात असून, केवळ कवडीमोल किमतीत घेतलेली जागा आज लाखो रुपयांनी गुंठेवारी करून विकली जात आहे.
तुकडा बंदी कायद्याला हरताळ या लोकांनी फासला असून, शासनाच्या नियम व आदेशच या लोकांनी पायदळी तुडवले आहेत. सद्यस्थितीत खोर, देऊळगावगाडा, भांडगाव गावाच्या हद्दीत अनेक ठिकाणी जिकडे पाहिले जाईल तिकडे या प्लॉटिंगने हैदोस घातला आहे. अशा प्लॉटिंगला मान्यता आहे का? याला जबाबदार कोण? असाच प्रश्न उपस्थित होत आहे. या प्लॉटिंगधारकांच्या बाबतीत कारवाई झाल्यास खरेदी केलेल्या प्लॉटिंगला कोण जबाबदार राहणार असाच प्रश्न आहे.
दौंड तालुक्यातील खोर, भांडगाव, देऊळगावगाडा या ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृत प्लॉटिंग केले आहे. या सर्व प्लॉटिंगवर लवकरच कारवाई होऊन मालमत्ता 'सरकार जमा'चे आदेश दिले जाणार आहेत.
– संजय पाटील, तहसीलदार, दौंड