पिंपरी : ‘सुकन्या समृद्धी’ ठरतेय लोकप्रिय, पालक घेताहेत मुलींच्या भविष्याची काळजी | पुढारी

पिंपरी : ‘सुकन्या समृद्धी’ ठरतेय लोकप्रिय, पालक घेताहेत मुलींच्या भविष्याची काळजी

नंदकुमार सातुर्डेकर: 

पिंपरी : बालिकांच्या कल्याणासाठी पोस्ट खात्याने सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना लोकप्रिय ठरत आहे. शहरातील 33 पोस्ट कार्यालयांमध्ये मिळून सुकन्या योजनेची दरमहा साधारण 2 हजार खाती उघडली जात आहेत. त्यातून पालकांना मुलींच्या भविष्याची असलेली काळजी, आत्मीयता समोर आली आहे. पोस्टातील गुंतवणूक सुरक्षित व उत्तम परतावा देणारी मानली जाते, त्यामुळे लोक पोस्टात गुंतवणुकीस प्राधान्य देत आहेत. पोस्टानेही विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. बालिकांच्या कल्याणासाठी सुरू केलेली सुकन्या योजना ही त्यापैकी एक आहे.

गर्व से कहो, बेटियाँ हैं हमें जान से भी प्यारी इनके लिए सुकन्या समृद्धी योजना है न्यारी, अशाप्रकारचे पोस्ट खात्याने केलेले भावनिक आवाहन लोकांच्या थेट हृदयाला भिडले आहे. मुलींच्या प्रति संवेदना असणार्‍या पालकांचा या योजनेस अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

योजनेची माहिती
नैसर्गिक पालनकर्ता (आई-वडील) / कायदेशीर पालकांद्वारा मुलींच्या नावाने खाते उघडले जाईल.
केवळ दोन मुलींच्या नावे खाते उघडण्याची अनुमती.
जन्म तारखेपासून वयाच्या 10 वर्षापर्यंत खाते उघडता येईल.
पालक /कायदेशीर पालकांच्या के.वाय.सी. कागदपत्राबरोबर मुलीच्या जन्माचा दाखला आवश्यक.
नामनिर्देशनाची सोय उपलब्ध.
सुरुवातीस रु.250/- इतक्या रकमेने खाते उघडता येईल.
नंतर रु.100/- किंवा त्याच्या पटीत खाते उघडल्यापासून 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा करता येते.
एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त रु.1,50,000/- जमा करता येतील.
एका आर्थिक वर्षात कितीही वेळा रक्कम जमा करता येते.
अनियमित खाते मात्र रुपये 50/- चा भुर्दड भरून नियमित करता येईल.
खात्यामध्ये रोख/चेक / डिमांड ड्राफद्वारा रक्कम जमा करता येईल. सध्याचा व्याजदर 7.4%
सरकारद्वारा अधिसूचित केलेले व्याज चक्रवाढ दराने खात्याला 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत जमा केले जाईल.
मुलीच्या वयाच्या 18वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी जमा रकमेच्या 50 टक्के रक्कम खात्यातून काढण्यास अनुमती. मुलगी दुसर्‍या गावात राहावयास गेल्यास खाते स्थलांतर करण्यास अनुमती.
खाते उघडलेल्या तारखेपासून 21 वर्ष पूर्ण झाल्यास खाते परिपक्व होते. तत्पूर्वी लग्न झाल्यास मुदतपूर्व खाते बंद करण्यात येईल.
खाते परिपक्व झाल्यानंतरदेखील बंद न केल्यास ते बंद होईपर्यंत नियमानुसार व्याज.
खातेधारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासहित रक्कम मिळते.
सेक्शन 80सी अंतर्गत आयकरात सूट.
मुदतीअंती मिळणारी पूर्ण रक्कम व्याजासहित करमुक्त आहे.
व्याजदरात भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे बदल होऊ शकतो.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
1. मुलीचा जन्म दाखला
2. पालकाचे / आई-वडिलांचे ओळखपत्र / रहिवासी दाखला/आधारकार्ड/ पॅनकार्ड.
3. पालकाचे / आई वडिलांचे फोटो.

पोस्टाच्या सुकन्या योजनेस पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. पिंपरी पोस्ट कार्यालयात या योजनेची दरमहा 50 ते 60 खाती उघडली जात आहेत.
                                                  – ए. पी. निमसूडकर, पोस्टमास्तर, पिंपरी

 

पोस्टाच्या सुकन्या योजनेस पालकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शहरातील 33 पोस्ट कार्यालयांमधून दरमहा साधारण 1980 ते 2000 खाती उघडली जात आहेत.
                                        – के. एस. पारखी, जनसंपर्क निरीक्षक, पोस्ट खाते

Back to top button