वाडा : जखमी विद्यार्थिनीसाठी शिक्षिका ठरल्या देवदूत | पुढारी

वाडा : जखमी विद्यार्थिनीसाठी शिक्षिका ठरल्या देवदूत

वाडा; पुढारी वृत्तसेवा: बुरसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका शमा घोडके मुथ्था या शाळेतील जखमी झालेल्या वैष्णवी बुरसे या विद्यार्थिनीसाठी देवदूत ठरल्या. सहावीत शिकणारी वैष्णवी बुरसे ही विद्यार्थिनी सोमवारी (दि. 19) सकाळी खेळताना उंचावरून पडली. तिला मोठी जखम झाली. घर जवळ असल्याने ती घरी गेली.

मात्र, जखम मोठी असल्याने रक्तस्राव होऊ लागला. वैष्णवीचे आई – वडील आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी शाळेत संपर्क करून औषधोपचार व दवाखान्यासाठी मदत मागितली. शिक्षिका शमा घोडके यांनी दुचाकीवरून तिला तत्काळ वाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, जखम मोठी असल्याने तेथील डॉक्टरांनी चांडोली ग्रामीण रुग्णालयात नेण्याची सूचना दिली. घोडके यांनी तत्काळ घोडेगाव येथून रुग्णवाहिका मागवली. मुलीच्या आईला सोबत घेऊन चांडोली येथे मुलीस नेले.

मात्र, तेथील डॉक्टरांनी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्याची सूचना दिली. त्यानुसार तिला पिंपरी येथे नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून उपचारास नकार दिला. यामुळे हतबल झालेल्या घोडके यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मुलीस दाखल केले. सायंकाळी सहा वाजता विविध तपासण्यांनंतर मुलीवर उपचार सुरू झाले.

डॉक्टरांनी मुलीचे ऑपरेशन करावे लागेल असे सांगितले. मुलीच्या आईकडे पुरेसे पैसे नव्हते. परंतु, घोडके यांनी आवश्यक साहित्य आणि औषधे आणून दिली. त्यानंतर मुलीचे ऑपरेशन झाले. रात्री उशिरापर्यंत घोडके ससूनमध्ये थांबल्या. मुलीचे वडील आल्यावर त्या पुण्यातील नातेवाइकांकडे गेल्या.

दुसर्‍या दिवशी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांनी ससूनमध्ये जाऊन जखमी मुलीची भेट घेत तिला धीर दिला. जखमी झालेल्या विद्यार्थिनीस योग्य उपचार मिळावेत यासाठी शिक्षिका शमा घोडके यांनी जे प्रयत्न केले त्याबद्दल जिल्हा परिषद, पंचायत समिती खेड, ग्रामपंचायत बुरसेवाडी, ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

 

Back to top button