भाजपच्या विकास योजना घरोघरी पोहचवा; निर्मला सीतारामन यांचे कार्यकर्त्यांना आवाहन | पुढारी

भाजपच्या विकास योजना घरोघरी पोहचवा; निर्मला सीतारामन यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बावधन; पुढारी वृत्तसेवा: ‘भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविलेल्या योजना अणि विविध विकासकामे कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचवावीत,’ असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बावधन येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. बावधन येथील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमध्ये भाजप बारामती लोकसभा मतदारसंघातील युवा, ओबीसी, अनुसूचित जाती जमाती, महिला, अल्पसंख्याक, किसान मोर्चाच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.

निर्मला सीतारामन म्हणाल्या,‘ नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकचा निर्णय बंद करून मुस्लिम महिलांवरील अन्याय दूर केला. त्यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही चांगली कामगिरी होत आहे. देशातील आठ कोटी कुटूंबांना उज्ज्वला योजनेतून गॅस सिलिंडर देण्यात आले आहेत. अजून एक कोटी कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.’ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, राहुल कुल, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, महिला अध्यक्षा कांचन कुल, आदी उपस्थित होते.

चिमुरडीचे स्वागत भावले…
पाटीलनगरमधून एनडीए रस्त्यापर्यंत काढलेल्या कार्यकत्र्यांच्या रॅलीत निर्मला सीतारामन सहभागी झाल्या होत्या. या वेळी जान्हवी आढाव या चिमुरडीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. हे स्वागत अर्थमंत्र्यांना भावले. या वेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना हात उंचावून अभिवादन केले. दरम्यान, निर्मला सीतारामन यांचा साधेपणा पाहून उपस्थितांना त्यांच्यासमवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.

Back to top button