राज्यात सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढतेय! सरकारी, खासगी रुग्णालयांमधील चित्र | पुढारी

राज्यात सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढतेय! सरकारी, खासगी रुग्णालयांमधील चित्र

प्रज्ञा केळकर – सिंग
पुणे : गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: कोरोना काळात लक्षणीय वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयांमध्ये नैसर्गिक प्रसूतींवर भर दिला जात असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कोरोना प्रादुर्भावादरम्यान शासकीय रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली. त्यामुळे प्रसूतीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळेच 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील सिझेरियन सेक्शन प्रसूतींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

वेदनारहित प्रसूतींवर भर, मुहूर्त किंवा तारीख ठरवून बाळाचा जन्म होण्याकडे वाढता कल, वाढती आर्थिक क्षमता, कोरोना काळात वाढलेली गुंतागुंत अशा विविध कारणांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये सिझेरियन सेक्शनच्या प्रसूतींमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये 2017-18 मध्ये 24 टक्के सिझेरियन प्रसूती झाल्या होत्या. 2022-23 मध्ये हे प्रमाण 35 टक्क्यांवर पोहोचले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये 17 टक्के, तर 2022-23 मध्ये 26 टक्के सिझेरियन प्रसूती
झाल्याचे आकडेवारीवरून निष्पन्न होत आहे.

प्रत्येक कुटुंबात गर्भवती महिलेचे आरोग्य आणि प्रसूती ही अत्यंत महत्त्वाची असते. प्रसूतीनंतर माता आणि बाळ सुखरूप असावे, याबाबतीत कोणतीही तडजोेड केली जात नाही. अतिजोखमीच्या गर्भवती मातांना अतितत्काळ सिझेरियन शस्त्रक्रिया सेवा उपलब्ध न झाल्यास मातेच्या आणि बाळाच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आवश्यकतेनुसार गुंतागुंत टाळण्यासाठी सिझेरियन सेक्शनद्वारे प्रसूती केली जाते.

अकाली बाळंतपण, पायाळू मूल, प्रसूतीपूर्व रक्तस्राव, जुळया मुलांची गर्भधारणा, पौगंडावस्थेतील अथवा कमी वयातील गर्भधारणा, अशा अनेक कारणांमुळे सिझेरियन सेक्शन प्रसूतींवर भर दिला जातो.

    – डॉ. नितीन अंबाडेकर,
                                                आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य

अतिजोखमीची गर्भधारणा असेल, तर सिझेरियन सेक्शनवर भर दिला जातो. पस्तिशीनंतर गर्भधारणा झाल्यास गुंतागुंत वाढते. त्यामुळे प्रसूतीमधील जोखीम वाढते. अनेक ठिकाणी नॉर्मल आणि सिझेरियन प्रसूतींसाठी सारखाच खर्च येतो. सिझेरियन प्रसूतींची शस्त्रक्रिया जास्त कालावधीची आणि गुंतागुंतीची असते. त्यामुळे मातेची आणि बाळाची स्थिती लक्षात घेऊनच प्रसूती कशी करायची, असा निर्णय घेतला जातो.

  – डॉ. पराग बिनीवाले,
                                                  अध्यक्ष, पुणे ऑब्सट्रेटिक
                                            अँड गायनॅकॉलॉजिकल सोसायटी

Back to top button