दुर्दैवी घटना: मुलीला भेटण्यासाठी आई वडील निघाले, पण भेट झालीच नाही; टँकरखाली आल्याने पती-पत्नी जागीच ठार | पुढारी

दुर्दैवी घटना: मुलीला भेटण्यासाठी आई वडील निघाले, पण भेट झालीच नाही; टँकरखाली आल्याने पती-पत्नी जागीच ठार

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील वृत्तपत्र वितरक दत्तात्रय झळके (वय ४८) आणि त्यांची पत्नी सुवर्णा झळके यांचे अहमदनगर जिल्ह्यात टँकरखाली आल्याने अपघातात दुर्दैवी निधन झाले. कुटुंबातील पती-पत्नीच्या दुर्दैवी अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दत्तात्रय झळके हे गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात वृत्तपत्र वितरणाचे काम करतात. झळके हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर विवाहित मुलीला भेटण्यासाठी अहमदनगरकडे निघाले होते. मात्र, तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. अहमदनगर जवळ कल्याण फाटा येथील कांदा मार्केटजवळ टँकर (एमएच १६ एई ९६०१) ची धडक बसून झालेल्या अपघातात झळके व पत्नी यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे तसेच पोलिस अंमलदार यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.

मयत दत्तात्रय झळके हे तळेगाव ढमढेरे येथील आयडीबीआय बँकेत शिपाई म्हणून देखील काम करत होते. तळेगाव ढमढेरे परिसरात ते मनमिळाऊ स्वभावामुळे परिचित होते. अपघाताची वार्ता परिसरात कळताच मोठी शोककळा पसरली आहे. दत्तात्रय झळके यांच्या पश्चात एक मुलगा, दोन विवाहित मुली, दोन भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

Back to top button