

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लेबर कन्सलटंट असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या घरी काम करणार्या स्वयंपाकी महाराजाने मालकाच्या तिजोरीतून वेळोवेळी तब्बल 22 लाखाची रोकड चोरी करून नेल्याचा प्रकार सॅलेसबरी पार्क येथे घडला. त्यासाठी त्याने चक्क अॅमेझॉन या वस्तू विक्रीच्या संकेतस्थळावरून तिजोरी विकत घेऊन ती तिजोरी उघडण्याचा सराव करून रक्कम लांबविल्याचा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी मुकेश महाराज उर्फ रामजांदू (वय 24, रा. सुखसागरनगर, बिबवेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार लेबर कन्सलटंट असून ते सॅलसबरी पार्कमधील एका सोसायटीत राहायला आहेत. मुकेश महाराज हा फिर्यादी यांच्याकडे मागील दोन वर्षापासून स्वयंपाकी महाराज म्हणून काम करत होता. नुकताच फिर्यादी हे त्यांच्या तिजोरीतील रोकड मोजत असताना त्यांना तिजोरी 22 लाखांची रक्कम कमी आढळली. घडलेल्या या प्रकारानंतर त्यांनी स्वारगेट पोलिस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. घरात स्वयंपाकी म्हणून काम करणारा आरोपी मुकेश कामावर न आल्याने त्याच्यावरचा संशय बळावला. तक्रारदाराने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यावेळी गुन्हा दाखल करत असताना मुकेशनेच फिर्यादीचे लक्ष नसल्याची संधी साधून कपाटातील 22 लाखांची रोकड लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयीत आरोपी असलेल्या मुकेशचा शोध घेत आहे.
मुकेश हा गेल्या दोन वर्षापासून तक्रारदारांच्या घरी स्वयंपाकी महाराज म्हणून काम करत होता. सकाळी आठ ते रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तो त्यांच्या घरात काम होता. अलीकडील आठ महिन्यांच्या कालावधीत त्याने हळूहळू करून तब्बल 22 लाखांच्या रकमेची चोरी केली. त्याने यासाठी अॅमेझॉन या वस्तू विक्रीच्या संकेतस्थळावरून फिर्यादीच्या घरी असलेली हुबेहुब तिजोरी खरेदी केली होती. त्या तिजोरीतून त्याने नंतर थोडी थोडी रक्कम काढल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे.
– प्रशांत संदे, सहायक पोलिस निरीक्षक, स्वारगेट पोलिस ठाणे.