

ओतूर, पुढारी वृत्तसेवा: रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, ओतूर परिसरात प्रामुख्याने दर्जेदार कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान उन्हाळी कांदा लागवडीसाठी शेतकरी कांदा बियाणे रोपवाटिका तयार करतात. या वर्षी परिसरात विक्रमी पाऊस झाला. यामुळे पावसाचे पाणी शेतात साठून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले.
कांदा बियाणे रोपवाटिकेत पाणी साठल्याने व पावसाचा मारा बसल्याने रोपे सडू लागली. रोपांची मर मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीनवरील रोगराईनेदेखील शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक धोक्यात आल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
जोरदार पावसामुळे काही शेतकर्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेती व्यवसाय कोलमडला आहे. शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाईसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी रोहोकडीचे सरपंच सचिन घोलप, आंबेगव्हाणचे सरपंच निवृत्ती धराडे, उपसरपंच दत्तात्रय गवांदे, पांडू गवांदे, निलेश महाले, अनिल बोडके यांनी केली आहे.
पावसाने सोयाबीन, तरकारी पिके तसेच कांदा बियाणे रोपवाटिका उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणीचा सामना करायला लागणार आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.