राजगुरुनगर : एमआयडीसी आणि बाजार समितीचा ठेकेदार यापलीकडे मोहितेंचे कार्य नाही, आढळराव यांचा पलटवार | पुढारी

राजगुरुनगर : एमआयडीसी आणि बाजार समितीचा ठेकेदार यापलीकडे मोहितेंचे कार्य नाही, आढळराव यांचा पलटवार

राजगुरुनगर, पुढारी वृत्तसेवा: पहिल्या दहा वर्षांत चाकण एमआयडीसी लुटली आणि तिसर्‍या टप्प्यात बाजार समितीची ठेकेदारी केली. यापलीकडे आमदार मोहिते यांचे कार्य नसल्याची खरमरीत टीका माजी खासदार, शिवसेना उपनेते (शिंदे गट) शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर केली. खेडच्या आमदारांची आमदारकी ही लोकांची कामे करण्यासाठी नसून फक्त माझ्यावर टीका करण्यापुरती आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या कामांना खीळ घालण्यासाठी आणि स्वतःच्याच पक्षातील लोकांचे राजकीय खच्चीकरण करण्यापलीकडे यांचे कार्य शून्य आहे. आमदार म्हणून त्यांचे तालुक्यात आजपर्यंत कुठलेही मोठे योगदान नाही. फॉर्म बाद झालेल्या बाजार समितीचा हा लाभार्थी आणि अशा शेतकर्‍यांच्या संस्थेच्या ठेकेदाराने माझ्यावर खोटे आरोप करण्यापूर्वी आपली पात्रता तपासावी, असा खरमरीत टोलादेखील आढळराव पाटील यांनी आमदार दिलीप मोहिते यांना गुरुवारी (दि. 22) प्रसिद्धी पत्राद्वारे लगावला आहे.

खेडचे आमदार मोहिते स्वतःच निष्क्रिय असून खेड तालुक्यातील लोकांसाठी पंधरा वर्षे सत्तेतला आमदार असूनही या महाशयांना इथे ना विमानतळ करता आले, ना लोकांसाठी एखादे मोठे हॉस्पिटल उभारता आले, ना तालुक्यात कोणता मोठा प्रकल्प आणता आला. 15 वर्षात खेड तालुक्याची प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न का केला नाही? स्वतःचा निष्क्रियपणा झाकण्यासाठीच त्यांनी मी व तत्कालीन आमदार स्व. सुरेश गोरे यांच्या माध्यमातून जानेवारी 2019 ला मंजुरी मिळालेल्या पंचायत समितीच्या कामाला तब्बल 3 वर्षे खीळ घातली. एव्हाना ही इमारत पूर्ण होऊन नागरिकांसाठी इमारतीचा वापरही आतापर्यंत सुरू झाला असता, असेदेखील ते म्हणाले.

आमदार दिलीप मोहिते यांना शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकारच काय? असा सवाल उपस्थित करून आढळराव पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी असताना मुख्यमंत्री कामे करत नाहीत, असे सांगून राष्ट्रवादी पक्षाचा आदेश झुगारला. पक्षावर दबावतंत्र वापरून राज्यसभा व विधान परिषदेला पक्षविरोधी भूमिका घेतली. शिवसेनेबद्दल तुम्हाला एवढा पुळका होता तर मग पुढे सभापती राष्ट्रवादीचा का केला, असा आरोपदेखील आढळराव पाटील यांनी केला आहे.

Back to top button