खेडमधील 156 गावांची ड्रोनद्वारे मोजणी | पुढारी

खेडमधील 156 गावांची ड्रोनद्वारे मोजणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभागाच्या वतीने गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील 156 गावांच्या गावठाणांची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण करण्यात आली आहे. याशिवाय 26 गावांची मॅन्युअल मोजणी पूर्ण झाली आहे. या सर्व गावातील लोकांना मालमत्तांच्या मालकीहक्कांच्या मिळकत प्रमाणपत्राचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे. यामुळे गावठाण हद्दीतील मिळकतीचे वाद व कागदपत्रांची अडचण दूर होणार आहे.

गावातील मिळकती संदर्भात आठ अ शिवाय कोणताही पुरावा अथवा रेकॉर्ड उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक कायदेशीर प्रश्न निर्माण होतात. गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेकदा अडचणी येतात; तसेच वादही होतात. याशिवाय गावठाणातील घराचा प्लॅन मंजूर करताना, लेआऊट करून घेताना, बँक कर्ज काढण्यासाठी देखील अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वंच तालुक्यात सर्व गावठाणाची ड्रोनद्वारे मोजणी करण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.

याचाच एक भाग म्हणून खेड तालुक्यातील सर्व गावांची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण झाली असून, सर्व्हे ऑफ इंडियाकडून मोजणी गावठाण नकाशे उपलब्ध होत आहेत. या मोजणी नकाशांवर जिल्हा भूमी अभिलेख विभागाच्या वतीने स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून चौकशी करण्यात येणार आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावठाणे व प्रत्येक व्यक्तीचे स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार असून, हे कार्ड संबंधित मिळकतकरधारकांना वाटप करण्यात येणार आहे.

खेड तालुक्यातील 156 गावांची ड्रोनद्वारे मोजणी पूर्ण झाली आहे. आता सर्व्हे ऑफ इंडियाकडून मोजणी नकाशे उपलब्ध होत आहे. या नकाशाची जिल्हास्तरावरून चौकशी होऊन नकाशे अंतिम केले जातील. त्यानंतर गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टीच्या मिळकत पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे.

                   – डी. एम. शिंदे, उप अधीक्षक भूमी अभिलेख, खेड

 

Back to top button